
दैनिक चालू वार्ता वाडा तालुका प्रतिनिधी-मनिषा भालेराव
वाडा तालुक्यातील महत्त्वाची व प्रतिष्ठेची समजली जाणारी खुपरी ग्रामपंचायत गेल्या ५ वर्षांत विविध कारणांनी पालघर जिल्ह्यात व महाराष्ट्रात गाजली. ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.प्रारब्धा तांडेल आजतागत सरपंच म्हणून कार्यरत आहेत. परंतु काही मूठभर कारस्थानी व स्वार्थी राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे गावच्या विकासकामांना मागील ५ वर्षांत अक्षरशः खीळ बसली गेली आहे.
सरपंच सौ.प्रारब्धा तांडेल या उच्चशिक्षित आहेत. प्रत्येक विकास कामांची त्या व्यवस्थित चाचपणी करतात. पण काही स्वार्थी लोकांचे मनुसदे पूर्ण होत नसल्याने त्यांना सातत्याने पदावरून हटविण्याचे दुष्कृत्य काही दलबदलू लोक व त्यांचे बगलबच्चे गेले ५ वर्षे करत आलेले आहेत. अश्यातच मागील महिन्यात सौ.तांडेल यांना पदावरून कमी करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. परंतु अपीलात असणाऱ्या सरपंच तांडेल यांना पदावरून कमी करण्याचे आदेश मंत्रालयाच्या वतीने स्थगित करण्याचे पत्रक १ जून रोजी जारी झाले. त्यानंतरही स्थानिक जिल्हा व तालुका प्रशासन दिरंगाई करतानाचे चित्र पाहायला मिळाले. अखेर १३ दिवसांनी पंचायत समिती वाडा यांच्या कडून सरपंच सौ प्रारब्धा तांडेल यांना पदभार स्वीकारण्या बाबत अधिसूचना प्राप्त झाल्या.
जनतेने ज्या विश्वासाने लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे, त्या जनतेची कामे करण्या ऐवजी नको ते उद्योग करून गावाला बदनाम करण्याचे आणि गावच्या विकासकामांना थांबविण्याचे जे काही कुटील राजकारण सदस्य श्री.संजय जाधव, उपसरपंच सौ.वैशाली लकडे यांचे पती श्री.योगेश लकडे व त्यांचे मूठभर बगलबच्चे यांनी केले आहे, त्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. श्री.योगेश लकडे यांच्या पत्नी व श्री.संजय जाधव यांच्या जवळच्या सदस्या सौ.वैशाली लकडे यांना अवघ्या २१ दिवसातच सरपंच पदावरून पायउतार होऊन स्वतःहून नामुष्की ओढवून घेण्याची वेळ आली आहे.