
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
पुणे, दि. १५: महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई व युथ एड फाउंडेशन संस्था, पुणे यांच्यामार्फत राज्यव्यापी उद्यमिता यात्रेची २० जून रोजी पुणे येथे सांगता होणार आहे.
त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या श्री शरदचंद्रजी पवार सभागृहात २० जून रोजी सकाळी १०.३० वा. सांगता समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तळागाळातील उमेदवारांचे समुपदेशन करुन स्वयंरोजगार सुरु करण्याकरिता युथ एड फाऊंडेशन संस्थेमार्फत बीज भांडवल प्रदान करण्याच्या उद्देशाने यात्रा आयोजित करण्यात आली आहे. उद्यमिता यात्रेचा प्रारंभ १० मे २०२२ रोजी मुंबई येथून करण्यात आला होता. राज्यातील विविध जिल्ह्यातून प्रवास करत ही यात्रा २० जून रोजी पुणे जिल्ह्यात दाखल होत असून येथे सांगता होणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान नवउद्योजकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करण्यात येणार असून स्वयंरोजगाराच्या उपलब्ध संधीबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये अधिकाअधिक इच्छुक उमेदवारांनी तसेच नवउद्योजकांनी सहभागी होवून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी केले आहे.