
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी-किशोर वाकोडे
मलकापूर: दि.१६. अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी (मलकापूर) संघटनेच्या वतीने न.प.प्रशासक व मुख्याधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
सादर केलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी कर्मचारी संघटनेसोबत बरेच वेळा तडजोड करून अनेक मागण्यांची पूर्तता सुध्दा केली असली, तरी काही महत्त्वपूर्ण मागण्या अद्याप पर्यंत प्रलंबीत आहेत.
नगर परिषद कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता विनाविलंब देण्यात यावा.डी ए एरियर्सची थकीत रक्कम,अंशदान निवृत्तीची थकीत रक्कम,बँक कर्जाचे कपात केलेले हप्ते भरणे,सेवानिवृत कर्मचाऱ्यांचे व न्यायालयाचे आदेशाने सेवेत कायम झालेले कर्मचारी यांची थकीत रक्कम आदी बाबत अनेकदा तत्कालीन नगर सेवक तथा “समतेचे निळे वादळ” चे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखेडे यांच्या मध्यस्थीने यशस्वी चर्चा करण्यात येऊन तत्त्वतः मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी न.प.ची आर्थिक स्थिती बरोबर नसल्याने पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.परंतु आज रोजी आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे.वरील सर्वच मागण्यांची पूर्तता करण्यास समर्थ असल्याने उपरोक्त मागण्या विनाविलंब पूर्ण करण्यात याव्या या आशयाचे निवेदन अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे शहर शाखा अध्यक्ष डी.के.टाक यांनी न.प. उप मुख्याधिकारी पगारे व कुटे यांना सादर केले आहे.यावेळी त्यांच्या समवेत सर्वश्री अशोक रानवे,गणेशकाका टाक,राजेश पथरोड व इतर पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.निवेदनाच्या प्रती बुलडाणा जिल्हाधिकारी,नागेज कंडारे व अशांतभाई वानखेडे यांना पाठविण्यात आल्या आहेत.