
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
मौखिक कर्करोगाचे तंबाखू हेच मुख्य कारण; तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त
अवैध विक्रीविरुद्ध कारवायांबरोबरच प्रभावी जनजागृती करा – जि.प.सीईओ अविश्यांत पंडा
अमरावती :- जिल्ह्यातील ४०.८ टक्के पुरूष व ९ टक्के स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थ चघळतात,अशी माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली आहे.हे अत्यंत चिंताजनक आहे.तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाया करतानाच विविध माध्यमांद्वारे प्रभावी जनजागृती करावी,असे निर्देश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद निरवणे,अतिरिक्त डीएचओ डॉ.रेवती साबळे,सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे,पोलीस उपअधिक्षक दिलीप सूर्यवंशी,डॉ.मुकुंद गुर्जर,उद्धव जुकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जगातील मौखिक कर्करुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या भारतात आढळतात.मौखिक कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ चघळणे हेच आहे.जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षणानुसार (जी.वाय.टी.एस) भारतात दररोज साडेपाच हजार व महाराष्ट्रात रोज ५३० मुले तंबाखूच्या व्यसनात गुंतत आहेत.जागतिक आरोग्य संघटनेने (हू) याला ‘जागतिक आपदा’ म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (एन.एफ.एच.एस) अमरावती जिल्ह्यातील ४०.८ टक्के पुरूष व ९ टक्के स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थ चघळतात.
ही आकडेवारी चिंताजनक आहे.तंबाखू नियंत्रणासाठी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची परिणामकारकता तपासावी व अंमलबजावणी प्रभावी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.नागरिकांमध्ये विशेषत: युवक,विद्यार्थ्यांपर्यंत व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबाबत माहिती संवाद,व्हिडीओ,सोशल मिडिया,पत्रके आदी विविध माध्यमांतून पोहोचवावी.जनजागृती कार्यक्रमांत सातत्य असावे.जिल्ह्यात ८६ शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत.याबाबतच्या निकषांचे अद्यापही पालन होते किंवा कसे,याची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे असे निर्देश श्री.पंडा यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये व शासकीय कार्यालयांत तंबाखूविरोधी जनजागृती करावी.तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणारांवर कारवाई करावी.सर्व कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी दिले.
अन्न व औषध प्रशासनातर्फे एप्रिल २०२१ ते मे २०२२ या काळात २८ प्रकरणी कारवाई करून ९२ लक्ष ७१ हजार ३६८ रू. रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दंडात्मक कारवायांत ७९ हजार २८० रू.रक्कम प्राप्त झाली,अशी माहिती डॉ.गुर्जर यांनी दिली.तंबाखू मुक्तीसाठी गतवर्षी ९ हजार १३३ व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात आले.त्याचप्रमाणे,१४ कार्यशाळा व ५८ गट चर्चा घेण्यात आल्या,असे श्री.जुकरे यांनी सांगितले.डेंग्यू व मलेरिया नियंत्रणाबाबतही आढावा घेतला.