
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर
पुणे: शहर व जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यांना पाणीपुरवठा करणार्या खडकवासला साखळीच्या धरणक्षेत्रात १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण दुष्काळाचे सावट उभे आहे. जून महिना संपूनही जोरदार पाऊस पडणार्या रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, वरसगाव धरणक्षेत्रात पावसाअभावी नद्या, नाल्यांसह धरणांचे बहुतांश पाणलोट क्षेत्र कोरडे ठणठणीत आहे. गुरुवारी(दि.३० जून) सायंकाळी धरणसाखळीत केवळ ८.८० टक्के म्हणजे अवघे २.५७ टीएमसी पाणी उरले होते. नाईलाजास्तव पुणे महापालिकेने शहरात पाणी कपातीची घोषणा केली आहे.
टेमघरपाठोपाठ वरसगाव, पानशेत धरणांनी तळ गाठल्याने पाण्यात बुडालेल्या शिवकालीन वास्तू, मंदिरे, दिसत आहेत. खडकवासला धरणाचेही बहुतांश पाणलोट क्षेत्र उघडे पडले आहे. मांडवी, खानापूर, मालखेड, सांगरुण आदी ठिकाणी धरणातील मूळ नदीपात्रासह ब्रिटिश राजवटीत धरणात बुडालेल्या वास्तूंच्या भग्नावशेषांचे दर्शन होत आहे वरसगावचे पाणलोट क्षेत्र दासवे तवपासून मोसे आणि पानशेतचे पाणलोट क्षेत्र कोशीमघर भालवडीपर्यंत उघडे पडले आहे