दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे: हिंदु कायद्यानुसार मामा-भाचीच्या लग्नाला कायद्याने मान्यता नाही. एका प्रकरणात तिने नातेवाईकांच्या आग्रहास्तव मामाशी लग्न केले. सुखाने संसार सुरू केला. दोघांना एक गोंडस मुलगीही झाली. मात्र, मतभेदामुळे दोघात वाद निर्माण होऊ लागले. शेवटी दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आहे. तोपर्यंत लग्नाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.
माधव वय ३५ आणि माधवी वय २८ (नावे बदललेली आहेत) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही पुण्याचे राहणारे. नात्याने मामा-भाच्ची असलेल्या त्यांचा विवाह ३ मे २०१४ रोजी झाला. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली ती आज सहा वर्षांची आहे. दोघांच्या विचारामध्ये खूप तफावत निर्माण झाली. त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या यावरून मतभेद होऊन वाद होऊ लागले. आपण आता व भविष्यातही एकत्र येण्याची शक्यता नसल्याने ३ जानेवारी २०२० पासून ते एकमेकांपासून विभक्त राहू लागले.
त्यानंतर, त्यांनी अॅड. अजिंक्य गायकवाड यांमार्फत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मुलीच्या ताब्यावरून वाद विकोपाला गेला.
