
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
विद्यालयात शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री जितेंद्र राजपूत यांनी या सभेचे अध्यक्ष पद भूषवले. तसेच प्रतिष्ठित नागरिक श्री नरेंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. मुख्याध्यापक श्री ईश्वर पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार केला. मुख्याध्यापकांनी आपल्या प्रास्ताविकेतून पालक शिक्षक सभेच्या आयोजनाच्या हेतू स्पष्ट केला. तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी जे विविध उपक्रम चालतात त्यामध्ये पालकांची भूमिका काय असेल ते समजावून सांगितले व पालकांना मदत करण्याचे आवाहन केले. तसेच पालकांच्या संमतीने विद्यालयात *कम्प्युटर एज्युकेशन* (संगणक शिक्षण) सुरू करण्याबाबतचा निर्णय संमत करून घेतला. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री संदीप चौधरी यांनी शालेय शिस्त, गणवेश व गृहपाठासंबंधी पालकांशी चर्चा केली. तसेच *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने* होणाऱ्या आठ दिवसाच्या सांस्कृतिक महोत्सवाची कल्पना श्री लक्ष्मण साळुंखे यांनी पालकांना दिली. या महोत्सवात सगळ्यांनी उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक, पालक व शिक्षक यांच्यात विविध विषयांवर सांगोपांग चर्चा झाली आणि सभा यशस्वी ठरली. शेवटी प्रमुख पाहुणे व पालक यांनी इयत्ता बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शिक्षकांनी बनविलेल्या शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनाची पाहणी करून साहित्यसंबंधी समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.