
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या मनस्तापातून पाच लाख पुणेकरांना दिलासा देऊ शकणाऱ्या फनटाइम ते पु. ल. देशपांडे उद्यान कालव्यावरील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, येथे चार ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागीच पथदिवे आहेत. ते हटवल्याशिवाय रस्ता सुरू करणे शक्य नसल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, हे खांब काढण्यावरून गेल्या दीड वर्षापासून पथ आणि विद्युत विभागांत नुसतेच पत्रव्यवहार सुरू आहेत. त्यामुळे हे खांब आधीच काढले गेले असते, तर हा रस्ता आतापर्यंत वापरात आला असता. दरम्यान, या रस्त्याची पथ विभागाने पाहणी केली असून खांब काढल्यास रस्ता सुरू करणे शक्य असल्याचेही सांगण्यात येत आहे.
सिंहगड रस्त्यावर महापालिकेने उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. आधीच या रस्त्याची चाळण झालेली असून आता पावसामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी झाल्यावर एक किलोमीटर अंतर ओलांडण्यासाठी तब्बल दीड-दोन तास घालवावा लागत आहे. त्यामुळे हे खांब हलविण्याचे काम १५ दिवसांत होईल असे अधिकृत सूत्रांनी सांगितले