
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला.
यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मात्र खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी काही मंत्र्याचा शपथविधी तर निवडणुकीनंतर काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे जरी दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होत असला तरी सर्वच खाती लगेच भरली जाणार नाहीत. दोन ते तीन मंत्रिपद रिक्त ठेवली जातील अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाला १५ मंत्रीपदे तर भाजप स्वतःकडे २८ मंत्रीपदे ठेवण्याची शक्यता आहे.