दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
खामगांव: दि.८. तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पंजाब नॅशनल बँक शाखा-खामगाव येथून कर्ज काढले आहे. परंतु बँकेने बरेच खाते शेतकऱ्यांना कोणतेही पूर्व सूचना न देता होल्ड केले आहेत. ती खाते होल्ड वरून काढून शेतकऱ्यांचे व्यवहार सुरळीत करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि.७ जुलै रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सध्या स्थितीत शेतकऱ्यांची शेती मशागत, पेरणी ,कोळपणी, खते बी बियाण्यांची आवश्यकता असताना बँकेकडून शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करण्यात येत आहे. तसेच पीएम किसान योजना, घरकुल लाभार्थी अनुदान, शेतकऱ्यांचे बचत रक्कम नाफेड चे जमा झालेले पैसे बचत खात्यात असताना बँकेने ही खाते होल्ड केलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.परिणामी शेतकऱ्यांची सर्व कामे स्थगित झालेली असून अनेक शेतकऱ्यांचे पैसे अभावी शेती कामे सुद्धा रखडलेली आहे. तरी पंजाब नॅशनल बँक शाखा खामगाव तसेच इतर राष्ट्रीयकृत बँकांनी होल्ड केलेली शेतकऱ्यांची खाते होल्ड वरून काढून शेतकऱ्यांचे व्यवहार सुरू करावे. तसेच पीक कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी वतीने करण्यात आली. या निवेदनावर वंचित जिल्हा अध्यक्ष गणेश चौकशे, तालुका अध्यक्ष प्रभाकर वरखेडे, नितीन सूर्यवंशी, रामचंद्र खंडारे, महादेव राठोड, सागर कळसकार ,चंद्रकांत टेरे, यांच्यासह बहुसंख्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
