
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई | शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आणि आता त्यांनी आपणच खरी शिवसेना असा दावा देखील केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील दावा केला आहे.
त्यासाठी त्यांची न्यायालयात लढाई सुरु आहे. शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाणार याची पूर्ण कल्पना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना आहे. त्यांनी त्याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला आहे.
या पार्श्वभुमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, आमची उद्धव ठाकरेंना विनंती आहे की त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन सुवर्णमध्य काढावा, असं केसरकर म्हणाले. वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंबाबत मी काही बोलणार नाही. वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला तर मार्ग निघू शकतो. शेवटी वरिष्ठांच्या पातळीवर हे सर्व चालते. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चांगले संबंध आहेत. त्यांनी मार्ग काढावा, असंही केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. त्यामुळे हा शिवसेनेच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. न्यायालयात 11 जुलै रोजी 16 अपात्र आमदारांवरच्या कारवाईचा निकाल आहे. त्यानंतर लगेच शिवसेनेचे धनुष्यबाण हातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता पक्ष बळकट करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.
उद्धव ठाकरे धनुष्यबाण चिन्ह गेले तर नवीन चिन्ह थोड्याच अवधीतच घराघरात पोहोचवण्याची तयारी ठेवा आणि त्या अनुषंगाने कामाला लागा असा आदेश सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे.