
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यात सत्तानाट्य रंगलेलं असताना पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा कोण करणार यावरुन चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचीच चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आले आणि महापूजा ते करणार यावर शिक्कामोर्तब झालं.
दरम्यान, आपण पंढरपूरला जाणार आहोत, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे. वारकऱ्यांच्या आग्रहाखातर आपण पंढरपूरला जाणार आहोत, असं ते म्हणाले आहेत. वारकऱ्यांनी आपल्याला आग्रह केला की, आपण माऊलींच्या पूजेला यावं. त्याचा मान ठेवून आपण पूजेसाठी जाणार आहोत. मात्र आत्ताच्या गर्दी-गोंधळात नव्हे, तर परिस्थिती शांत झाल्यावर आपण नंतर वारकऱ्यांच्या आग्रहाखातर पूजेसाठी पंढरपूरला जाणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर वारकरी संघटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शासकीय महापूजेचं निमंत्रण घेऊन गेली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे यंदाची आषाढी एकादशीची विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.