
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दि. २४ जून २०२२ रोजी दुपारच्या दरम्यान पुण्याहून एका रुग्णाबद्दल फोन आला. सुंदरबाई रामचंद्र हंबर्डे वय ५५ वर्षे रा. पाटोदा ता. नायगाव जि. नांदेड या आपल्या मुलासह आषाढी वारी करीत होत्या. (रुग्ण व नातेवाईकांच्या संमतीने नामोल्लेख) सासवडला तंबूमध्ये पंधरा-वीस वारकर्यांसह विश्रांती घेत होत्या. पहाटे २-३ च्या दरम्यान त्यांच्या पोटात दुखत होते. चक्कर येत होती, बोलताही येत नव्हते. डोळे जडावलेले . हळूहळू त्या महिलेचा त्रास वाढत गेला. त्यांच्यावर सरकारी व स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार करून पुण्याच्या एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. निदान संदिग्धतेमुळे रुग्णाची प्रकृती खालावत चाललेली, रुग्णाचा श्वास बंद पडला. तेथील डॉक्टरांनी त्यांना तात्काळ व्हेंटिलेटरवर ठेवलेले. सदरील रुग्णाच्या मुलाने आणि नातेवाईकांनी मुखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधी मा. श्री चंद्रकांत घाटे यांच्याशी संपर्क साधला अन् श्री घाटे यांनी माझ्याशी संपर्क करून तातडीने त्या रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलण्याची विनंती केली. मी त्या डॉक्टरांशी चर्चा केली. तोपर्यंत निदान निश्चिती झाली नव्हती. रुग्णाची एकंदरित परिस्थिती पाहून मी तेथील डॉक्टरांना पूर्वानुभवाने म्हणालो रुग्णास मण्यार जातीच्या सापाचा दंश झालेला आहे… अन् मग मी यावरील उपचारांची माहिती त्या डाॅक्टरांना दिली. त्यांनी मोठ्या मनाने माझा सल्ला ऐकला आणि रुग्णावर उपचारांची पराकाष्ठा केली.
दिंडी मध्ये लाखो भाविक प्रवास करतात आणि अनेकजण दाटीवाटीने रोडच्या बाजूला, शेतामध्ये अथवा तंबूमध्ये भगवान भरोसे झोपतात.
पंढरीच्या वाटे ।
चालता न कष्ट ।
दुःख दैन्य नष्ट ।
विठू करी ॥
आपल्या महाराष्ट्रात नाग, मण्यार, घोणस व फुरसे हे विषारी साप आढळतात. मण्यार दंशामध्ये रुग्णांना त्याची संवेदनाही होत नाही. जमीनीवर झोपणाऱ्यांना हा दंश होण्याची जास्त शक्यता असते. मण्यारचा दंश नागापेक्षा दहापट विषारी असतो. रुग्ण गंभीर होऊन दगावण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी डाॅक्टरांना High index of Suspicion असायला हवा तरच डॉक्टर त्याचे निदान करु शकतात. त्या महिलेला काय झाले ते माहितही नव्हते. माझ्या प्रदीर्घ अनुभवातल्या ज्ञानामुळे व तेथील डाॅक्टरांनी केलेल्या उपचारानंतर ती महिला जवळपास ५० तासानंतर शुद्धीवर आली. नंतर चार दिवसानी त्यांना डिसचार्ज देण्यात आला.
पांडुरंग हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. दिंडीत लाखो भाविक दरवर्षी जातात. आयुष्यात एकतरी वारी अनुभवावी असं म्हणतात… मलाही या वारीला जावे असं दरवर्षी मनापासून वाटतं परंतु तो सोहळा अनुभवता नाही येत… वारी ही दरवर्षी जून-जुलै महिन्यात येते. या दोन महिन्यातच सर्पदंशाच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असते.
तुकोबांच्याच शब्दात सांगायचे झाले तर असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।। मागील ३५ वर्षांपासून मी मुखेड सारख्या ग्रामीण भागात काम करत असल्याने आजवर ७५०० दंश रुग्णांवर उपचार करता आले. १९८८ ला या भागातील सर्पदंशाचा मृत्यूदर जो २५% होता तो आता ०.९८ % इथपर्यंत कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो. तो शून्यावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. सदरील रुग्ण बरा झाला आणि पर्यायाने त्यांचा दुसरा जन्म झाला.
नाही जात वारीला,
तरीही मी वारकरी ।
रुग्ण आहे विठ्ठल माझा,
रुग्णालय हीच माझी पंढरी ।।
(अस्मादिक)
त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी माझा सल्ला घेऊन उपचार करण्याची संधी दिली. याबद्दल त्या रुग्णांच्या नातेवाईकांचे अन् उपचार कर्त्या डॉक्टरांचे ऋण व्यक्त करावे तेवढे कमीच आहेत. रुग्ण बरा झाला व नंतर ते मला भेटायला आले. मी प्रत्यक्ष जरी त्या वारीला गेलो नसलो तरी या रुग्णाच्या भेटीने प्रत्यक्ष पांडुरंग भेटल्याची भावना झाली. एरवी मी बर्याच वेळा पंढरपूरला दर्शनासाठी गेलेलो आहे पण वारीतला भक्तीभाव मला अजूनही अनुभवायला मिळालेला नाही.
चालतात ते ‘प्रवासी’ , श्रद्धेने प्रवास करतात ते ‘यात्री’ अन् भगवंताच्या ओढीने धावणारे ‘वारकरी’…
महाराष्ट्रात दरवर्षी लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी धावत असतात. या वारीत धर्म, जात, पंथ, गरीबी, श्रीमंती या सर्व विषमता विसरून वारकरी नामस्मरणात तल्लीन होतात. भक्तीचा आनंद घेतात.
पंढरीच्या लोका नाही अभिमान ।
पाया पडे जन एकमेका ।।
ही खरी महाराष्ट्राची संस्कृती होय. असंख्य वारकरी पायी प्रवास करतात आणि या निमित्ताने महाराष्ट्राचे दर्शन या वारीत घडते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या देहूपासून व माऊलींच्या आळंदीतून निघणार्या वारीत अनेक दिंड्या सहभागी होतात आणि हा महासागर विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपुरात येत असतो. ‘विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल.. ठ्ठल.. ठ्ठल.. ठ्ठल’ – या नामातील कंपने हृदयात प्रेमभावना जागृत करतात. आजपर्यंत मी प्रत्यक्ष जरी वारीला गेलो नसलो तरी हा एक रुग्ण मला प्रत्यक्ष भगवंत दर्शनाचा लाभ देवून गेला. अशा रुग्णांची सेवा करण्याची संधी भगवंत मला देतो. यातच मला अपार आनंद आहे आणि परमेश्वर कृपेने त्यात मला अनेकवेळा यशही प्राप्त होते.
तुच कर्ता आणि करविता,
शरण तुला भगवंता मी रे…
वैष्णवांचा हा मेळा ज्यात अनेक जण अन्नदान, रक्तदान, आरोग्य इ. सेवा करतात. अनेक प्रकारची सेवा भाविकांना जागोजागी उपलब्ध करून दिली जाते. मलाही ही आगळी वेगळी आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी भरुन पावलो…
सेवेहूनी थोर | आणिक पुण्य नाही फार ||
मला मुखेडहून वारीत पंढरपूरला जाता नाही आलं. रुग्ण सुंदरबाई बर्या झाल्यावर पुण्याहून सरळ मुलगा शिवदाससह मला भेटायला आलेल्या. सर्व कहाणी त्यांनी मला सांगितली. माझ्या अनुभव ज्ञानाचा वापर या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेेर काढण्यासाठी झाला. याचा मला अपार आनंद आहे अन् निश्चितच ‘वारी’ पूर्ण झाल्याची भावना माझ्या मनात आहे.
होऊ देत सुखी सारे । सर्वा आरोग्य लाभू दे । पाहू देत मांगल्य सारे । न कोणा दुःख होऊ दे ।
माझ्या हातून अनंतांची सेेवा घडो हेचि अनंतासी मागणे।
॥ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम॥
सर्वांना #आषाढी_एकादशीच्या मनस्वी शुभेच्छा…🙏🙏
डॉ. दिलीप पुंडे
सदस्य, सर्पदंश तज्ज्ञ समिती, जागतिक आरोग्य संघटना (WHO)
पुंडे हॉस्पिटल, मुखेड जि. नांदेड
ईमेल :drpundedp@gmail.com
दि.१० जुलै, २०२२ (आषाढी एकादशी)