
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
ते मी नमियेली ! माऊली !! तापीतिरी वसली !!!
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् I
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् I
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
धर्मसंस्थापनेचे नर। ईश्वराचे अवतार।
झाले आहे पुढे होणार। देणे ईश्वराचे॥
भारतवर्षात देव-देश-धर्माच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक संत महंत ऋषी मुनींचे अवतार होत असतात , साक्षात योगेश्वर श्रीकृष्णाने आपल्या गीतामृतात हे वचन दिले आहे.
हेच वचन सार्थ ठरविण्यासाठी त्रिगुणात्मक-त्रिगुणातीत दत्तप्रासादिक श्रीनाथ पीठ परंपरेचे तत्कालीन सवाई धर्मधुरंधर श्रीगोविंदनाथ गुरू गोपालनाथ महाराज आपले धर्मकार्य पूर्ण करण्यासाठी श्रीक्षेत्र सुर्जी अंजनीग्राम येथे आले. अलकनंदा गंगामाईस्वरूप शरनिरेच्या तटावर महाकाय प्राचीन अश्वत्थ वृक्षाच्या छायेत नाथांची छावणी पडली. डेरे कनाती लागल्या. पंचक्रोशीतील भाविक नाथांच्या दर्शनासाठी येऊ लागले. दुसरा दिवस शनिवार..नाथ परंपरेतील भिक्षेचा दिवस. सद्गुरु गोविंदनाथ महाराज आपल्या शिष्य समुदायासह गोविंद राssम गोविंद गर्जत सुरजीतील हनुमंत पाराजवळ आले आणि याच हनुमंत पारावर त्यांना त्यांच्या धर्मकार्याची धुरा पूढे घेऊन जाणारा हनुमंत देवबा स्वरूपात भेटला. देवबा म्हणजेच परब्रम्ह महारुद्र जगद्गुरू श्रीदेवनाथ महाराज ! आपले इप्सित कार्य पूर्ण करणारा सतशिष्य हाच देवबा हे गोविंदनाथ जाणून होते मात्र देवबा मी हनुमंताशिवाय कोणालाही गुरू मानणार नाही हा अट्टहास धरून असल्याने गुरू-शिष्याची ही पहिली भेट प्रश्नोत्तरातच संपली आणि आम्ही हनुमंत आज्ञेनुसार तुझ्याकडे आलो होतो आता मात्र तुलाच हनुमंत माझ्याकडे घेऊन येतील असे म्हणुन गुरू गोविंदनाथ स्वामी पुढे मार्गस्थ झाले.
कोण होते हे सद्गुरू स्वामी गोविंदनाथ?
स्वामी गोविंदनाथ हे मुळचे चिंचवडच्या सरदार देव मामलतदार घराण्यातले. त्यांच्या पिताजींना त्रिपुटीच्या परब्रम्ह श्रीगोपाळनाथांच्या गूढ व्यक्तिमत्वाबद्दल जिज्ञासा होती. कोणीतरी त्यांना सांगितले की नाथमहाराज उपासनेत मद्य-मांसादिकांचा उपयोग करतात व ते वाममार्गी आहेत. म्हणून गोविंदनाथांचे वडीलांनी नाथ वाई मुक्कामी असताना त्यांच्या पूजास्थानाला वेढा दिला. आत जाऊन पाहतात तो, नाथांपुढे सुंदर सुवासीक पुष्पे व शुद्ध गोरस याशिवाय दुसरी कुठलीच वस्तू नाही. देव सरदार चकीत झाले. श्रीनाथांच्या शुद्ध सात्वीक उपासनेचा त्यांना प्रत्यय आला. त्यांच्या समवेत त्यावेळी त्यांचा पुत्र बालगोविंद होता. नाथांचे अपूर्व सामर्थ्य, दैवी शक्ती व तेजस्वी व्यक्तिमत्व यांनी तो भारावून गेला. नाथांचे सेवेसाठी तो नाथांजवळच राहीला.
पुढे कोल्हापूर येथे जगदंबेच्या मंदिरात नाथांनी त्याला अनुग्रह करून शिष्यत्व दिले. त्यांचे सांप्रदायीक नाव गोविंदनाथ असे ठेवले. पुढे श्रीनाथांनी गोविंदनाथांना श्रीएकनाथ पीठ परंपरेचे फिरते स्थान सुर्जी अंजनगाव येथे स्थिर करून देशपांडे कुळातील देवबा जे पुढे देवनाथ महाराज झाले त्यांच्या श्रीनेतृत्वात श्रीनाथ पीठ, श्रीदेवनाथ मठ म्हणून उदयास येईल अशी व्यवस्था करावी असे सांगितले. प्रारंभी उल्लेख केलेल्या प्राचीन अश्वत्थ वृक्षाखाली जिथे गोविंदनाथ मुक्कामी होते त्याच ठिकाणी आज सुर्जी अंजनीग्रामचे विख्यात देवनाथ पीठ असून नाथकार्याचा डंका अखंड भारत वर्षात गाजत आहे.
खरं तर गोविंदनाथ महाराजांना तत्क्षणी गुरू न करता देवबा-देवनाथांनी “पानी पिना छान के गुरू करना जान के” हीच उक्ती सार्थ केली. अर्थात नाथांच्या अनेक लीलांमधील ही एक तरंग लहरी होती. गोविंदनाथ स्वामी महाराजांनी आधीच कल्पना दिल्यानुसार आता देवबाला गुरूंचा विरह सहन होत नव्हता आणि गुरूंच्या म्हणजेच स्वामी गोविंदनाथांच्या शोधार्थ देवबा रानावनात नगर ग्रामात हिंडु लागला. वाटेत अनेक साधू संत पथीक यांची भेट झाली. हम तो बैरागी बैरागी…पुढे देशाटन करायचं आहे याचा हा संकेत होता. अखेर हनुमंत हनुमंती एकी ऐक्य झाले आणि देवबा -गोविंदनाथ यांची भेट झाली. पुढे योगीराज समर्थ सद्गुरू आनंदीनाथ स्वामी महाराज यांच्या जालना येथील मठात गोविंदनाथ महाराज यांनी देवबाला योगपट्टाभिषेक करून धर्मभास्कर सुर्जी पीठाधीश्वर जगद्गुरू देवनाथ महाराज या नामाभिधानाने अलंकृत केले.
विदर्भातील धर्मकार्य आटोपून गोविंदनाथ स्वामी महाराज जवळच लागून असलेल्या मध्य प्रांतातील तापी तीरावर वसलेल्या ब्रह्मपुर (बऱ्हाणपूर) येथे वास्तव्यास गेले. ‘स्वानंदी’ व ‘निजानंदी’ असे त्यांचे दोन अभंगसंग्रह उपलब्ध आहेत. यात सुमारे ४००० अभंग आहेत. शिवाय ‘विठ्ठल विजय’ हा सुमारे १४०० ओव्यांचा ग्रंथ त्यांनी रचला. पुढे नाथांची प्रकृती खालावली. तश्याही परिस्थितीत नाथांचे साधकांना नामामृत रसपान अविरतपणे सुरूच होते.
ते मी नमियेली ! माऊली !! तापीतिरी वसली !!!
पाहुनी उत्तम हे तापी तीर ! बऱ्हाणपूर नगर
तेथे येऊनि साचार ! आम्हांसी होणे स्वार
वसुदीनी ही वदली ! माऊली..
शके सतराशे तेहतीस ! वत्सर म्हणती ज्यास
प्रजापती तो आणि मास ! आषाढ चतुर्थीस
शुक्ली समरसली ! माऊली…
इंदुवासर ते दिनी ! होता मध्यरजनी
बैसली योगिनी निजासनी ! त्रिवार कर फिरुवुनी
स्वरूपी स्थिरावली ! माऊली…
ते मी नमियेली ! माऊली !! तापीतिरी वसली !!!
मात्र शरीरव्याधी कोणाला चुकली आहे…शके १७३३ प्रजापती नाम संवत्सर आषाढ शुक्ल चतुर्थीस माध्यान्ह समयी समर्थ सद्गुरू गोविंदनाथ महाराज अकळ अमळ अढळ या त्रिपुटीशी संधान साधलेल्या परब्रम्ह सद्गुरु गोपाळनाथपदी विलीन झाले. सद्गुरू देवनाथ महाराज आणि सद्गुरू दयाळनाथ महाराज यांनी गोविंदनाथांचे और्ध्वदेहिक संपन्न करून तापी तटावर समाधीस्थान बांधले.
जगद्गुरू देवनाथ महाराज यांनी आपल्या सद्गगुरूंच्या स्मरणार्थ तापी तीरी तर्पण केले आणि शीघ्रकवी असलेल्या देवनाथांच्या मुखातून तापीच्या डोहातच ऊभे असताना शब्द स्फुरले…
जयदेव जयदेव जय सद्गुरूनाथा
अकळा अमळा अढळा अगणित गुणगाथा
मन हे समरस स्वरूपी अखंड सुखकर हो
कोंदळला स्वानंदू अनुपम सुखलाहो
निर्गुण निर्विकार भरला हा डोहो
मावळला आभास गळला संदेहो
जयजयाजी सद्गुरुनाथा गोविंदा स्वामी गोविंदा
भेदा भेदातीत तूं सत् चित् पद सुखदा
निजसत्तेने तोडुनी माया अपवादा
दिधले देवनाथा अनंत स्वानंदा
सांप्रतकाळात श्रीनाथ पीठाधीश्वर परमपूजनीय आचार्य जितेंद्रनाथ स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने तापी तीरावरील गोविंदनाथ स्वामी महाराज यांच्या समाधीस्थानाचा जीर्णोद्धार झाला असून पूजा -अर्चना उत्सव आदि व्यवस्था सुचारु स्वरूपात कार्यरत आहेत.
ज्ञेयज्ञानज्ञाता नसे ठाव हाही
ध्येयध्यानध्याता नुरे जेथ काहीं
त्रयातीत स्वानंद दे जो निजार्था
नमो सद्गुरु स्वामी गोविंदनाथा
कृपादान देऊनी या देवनाथा
सुखी नांदवी उन्मनी नीजमाथा
सदानंद स्वानंद दे जो अनाथा
नमो सद्गुरु स्वामी गोविंदनाथा
गुरु म्हणजे ज्ञानाचा झरा आणि अखंड वाहणारा झरा,
गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य,
गुरू म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
गुरू म्हणजे विश्वास आणि वात्सल्य,
गुरू म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तीमंत प्रतीक,
आजपर्यंत कळत-नकळतपणे ज्ञान देणाऱ्या गुरू माऊलीला गुरूपौर्णिमा निमित्त कोटी कोटी प्रणाम...
लेखक :- डॉ.भालचंद्र माधव हरदास
नागपुर मो.नं.९६५७७२०२४२
संकलन :-महेंद्र शिंदीजामेकर
श्री देवनाथ मठ,अंजनगाव सुर्जी
मो.नं. ९३०७१९२२०५