
दैनिक चालु वार्ता कोरपना तालुका प्रतिनिधी-प्रमोद खिरटकर
नांदाफाटा ते सांगोडा रस्त्याचे रुंदीकरण गरजेचे
गडचांदूर – वणी या राज्यमार्गावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त झोपला आहे. यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.पहिल्याच जोरदार पावसात राज्यमार्गाची दयनीय दुरवस्था झाल्याने हा मार्ग जलयुक्त शिवार बनला असून अपघातांना आमंत्रण देत आहे. यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना हा रस्ता जीवघेणा झाला आहे. नक्की दुचाकी काढावी तरी कशी असा प्रश्न सुद्धा नागरिकांना पडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसात केलेली तात्पुरती मलमपट्टीचा पहिल्याच पावसात निघून गेल्याने रस्त्यांचा बट्ट्याबोळ झाला आहे.गडचांदूर वणी या राज्यमार्गावरील नांदाफाटा ते आवाळपुर व हिरापूर ते सांगोडा या मार्गावर मोठमोठे खड्डे खड्डे पडले असून रस्ता हा जणूकाही जलयुक्त शिवार बनला आहे. अरुंद रस्ता व त्यातही जीवघेणे खड्डे यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहनधारकांना वाहन चालवतांना डोकेदुखी झाली आहे. तर प्रवाशांना शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे खड्डे चुकवितांना अनेक लहान मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या भागातील संपुर्ण मार्गात खड्डे दिसून येत असल्याने मार्गावर लहान-मोठ्या खड्ड्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवत वाहन चालवतांना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या खड्ड्यांमुळे वाहन बिघडण्याचे, वाहनाचे पार्ट खिळखिळे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. महत्वाचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने वणी व चंद्रपूर सारख्या शहराला जोडणाऱ्या या मार्गाची झालेली दुरवस्था लाजिरवाणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी याच भागात केलेली डागडुजी केव्हाच गायब झाली असून मार्ग गावरान रस्ता बनला असल्याचे चित्र दिसत आहे.यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या महात्वाच्या रस्त्याकडे त्वरीत लक्ष देवून दुरुस्त करुन रस्त्याचे रुंदीकरण करून घ्यावे अशी मागणी परीसरातील नागरीक व त्रस्त वाहन चालक करीत आहे.