
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
आदमपूर व केसराळी मंडळात हजारो हेक्टर सोयाबीन पीके पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत शासनाने जाहीर करावी.
देगलूर:जिल्ह्यात सर्वच ठिकाणी गेल्या चार-पाच दिवसांपासून संततधार पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यात बिलोली तालुक्यातील आदमपूर व केसराळी मंडळातील कांही गावांतील व भागातील परिस्थिती ही पूरपरिस्थिती जनक बनत चालली आहे.
तालुक्यातील आदमपूर व केसराळी मंडळात रिमझिम, संततधार व अतिमुसळधार पावसामुळे आदमपूर, गळेगाव, बडीसावळी, खतगाव, केसराळी, टाकळी, अटकळी, आळंदी या गावची शेती ही नदी, नाले, ओहळ काठी असल्याने ते ओसंडून वाहत आहे. नदी नाले व ओहळाचे पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन हजारो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांवर सोयाबीन पिकांची दुबार पेरणीचे संकट आले होते. पेरणी झाली उगवण चांगली झाली व इवलेसे पिके असतांना आता •मात्र पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी या अस्मानी संकटात पूर्णतः मोडून पडल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांना या भयजन्य परिस्थितीकडे पाहून रडू कोसळत आहे.
जुनी थडीसावळी व गळेगाव येथील कांही घरात पुराचे पाणी घुसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच आदमपूर व आदमपूर फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावरून तसेच जुने गळेगाव
टाकळी रस्त्यावर जाणाऱ्या नाल्यावरून त्याच प्रमाणे केसराळी, खतगाव रस्त्यावर असलेल्या केसराळी नजीक पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने कांही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच सततच्या पावसामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून नेटवर्क गायब झाल्याने मोबाईल सेवा विस्कळीत झाली
लवकरात लवकर शासनाने या परिसरामध्ये नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत करावी ही जनतेतून मागणी होत आहे.