
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
प्रसिद्ध पक्षीमित्र अरुण शेवाणे यांच्या प्रयत्नाने वनअधिकारी घटनास्थळी दाखल
अमरावती :-१३ जुलै २०२२ ला मध्यरात्रीच्या सुमारास वेगवेगळ्या दोन गोठ्यातील एकूण ६ बकऱ्या ठार केल्याची घटना अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापूसतळणी येथे घडली.ही संपूर्ण बाब दि.१४ जुलै रोजी सकाळी गोठ्यात गेल्यावर लक्षात आली.
माहितीप्राप्तीनुसार,कापुसतळणी येथील वार्ड नं.-२ मधील शेख आबिद शेख हनीफ यांच्याजवळ २० ते २५ बकऱ्या आहेत.गावात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे ५ बकऱ्या दुसऱ्याच्या गोठ्यात बांधल्या होत्या.सकाळी घरमालक गोठ्यात गेले असता पाचही बकऱ्या मृत्यू अवस्थेत दिसल्या.त्यापैकी दोन बकऱ्यांचे पोटातील आतडी बाहेर निघालेली दिसली.यामध्ये चार महिन्याचा गर्भ असलेल्या दोन बकऱ्या,एक वर्ष वयाचे दोन बोकड व आठ महिने वयाची एक बकरी (पाठ) अशा एकूण पाच बकऱ्या ज्यांची किंमत ३५ ते ४० हजार रुपये दरम्यान आहे.तसेच गणेश विश्वनाथ महानकर यांच्या आठ-नऊ बकऱ्या असलेल्या गोठ्यात रात्री १.४५ सुमारास बकऱ्यांचा जोरजोराने ओरडण्यांचा आवाज आल्यामुळे बकरी मालक गणेश यांनी गोठ्याजवळ गेल्यावर चोर-चोर असा मोठ्याने आवाज केल्यामुळे कुणीतरी गोठ्यातून बाहेर जायचा आवाज आला आणि गोठ्यात एक बकरी मृत अवस्थेत होती तर दुसऱ्या बकरीचा जीव थोडक्यात बचावला.ही घटना संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली.पशु मालक यांनी ग्रा.सदस्य किशोर खडसे यांना फोन करून सदर घटनेची माहिती सांगितली.किशोर खडसे यांनी लगेच गावातील प्रसिद्ध पक्षीमित्र अरुण शेवाणे यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली.लगेच शेवाणे व खडसे यांनी रहिमापुर पोलीस स्टेशन,पशुवैद्यकीय अधिकारी व वनअधिकारी यांना फोन करून माहिती दिली.क्षणाचाही विलंब न करता पोलीस स्टेशनचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.पशुवैद्यकीय अधिकारी यांनी बकऱ्यांचे शवविच्छेदन करण्याचे सुचविले.परंतु पक्षीमित्र अरुण शेवाणे यांनी शवविच्छेदन करण्यास नकार देत जोपर्यंत वनअधिकारी येणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन होणार नाही असे म्हणतात ह्यामुळे एकच खळबळ उडाली.शेकडो नागरिकांनी शेवाणे यांच्या निर्णयाचे स्वागत केले.वनअधिकारी श्री.सोळंके व जी.आर.पारिया हे दुपारी ०१:०० वाजता घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.नंतर शवविच्छेदन करण्यास परवानगी दिली.अशाप्रकारे वनअधिकारी यांना घटनास्थळापर्यंत येण्यास भाग पाडले.चार महिन्या अगोदर अशा प्रकारच्या तीन घटना झाल्या होत्या म्हणून पुन्हा अशी घटना गावात घडू नये याकरिता वन अधिकारी येईपर्यंत शवविच्छेदन करणे थांबविले होते असे अरुण शेवाणे यांनी यावेळी सांगितले.
बकऱ्यांच्या भरोशावर दोन्हीही कुटुंबाचा उदरनिर्वाह असणाऱ्या दोन्ही व्यक्तींना शासनाकडून मदत मिळणे अपेक्षित आहे.तसेच या घटनेचा मी स्वतः शासनाकडे पाठपुरावा करेल.याकरिताच या घटनेशी संबंधित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामे करून घेतले असे पक्षीमित्र अरुण शेवाने यांनी यावेळी सांगितले.