दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी – दत्तात्रय वा. कराळे
परभणी लोकसभा शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी काल मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माझा जन्म शिवसेनेत झाला असून शेवटही शिवसेनेतच होईल असे सडेतोड सांगून अपप्रचारालाच पूर्णविराम दिला. बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टिका सर्वत्र सुरु आहे तर दुसरीकडे परभणीचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे सुध्दा शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाल्याचा अपप्रचार विरोधकांनी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खा. जाधव यांच्या बाबतीत मोठा गैरसमज निर्माण होणे स्वाभाविक आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीला विठ्ठल -रखुमाई महापूजेनिमित्त पंढरपूरला आले त्यावेळी तर खा. जाधव हे ना. शिंदे यांचेशी भेटले व काही तरी बोलले अशीही वावटळ उठवण्यात आली. तथापि अशी कोणतीही चर्चा झाली नाही, हेच खा. जाधव यांच्या विष्लेषणातून निष्पन्न झाले.
खा. जाधव यांनी दोन्ही जिल्हाप्रमुखांसह अन्य सर्व पदाधिका-यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी “माझा जन्म शिवसेनेत झाला आणि मी शेवटी शिवसेनेतच मरणार ” असा निर्धार त्यांनी ठामपणे मांडला. त्यामुळे खा.जाधव यांच्यावर केले जाणारे आरोप नि गैरसमज पूर्णपणे निकाली निघाले आहेत नव्हे जाधव यांनी त्या गैरसमजालाच पूर्णविराम दिल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ खा. जाधव यांच्या विरोधात कुणीही नि कितीही गैरसमज पसरवले तरी ते धातांत खोटे आहेत, असेच यावरुन दिसून येत आहे.
