
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -दत्तात्रय कराळे
कधीकाळी शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून संबोधले जाणारे रामदास कदम खरोखरच शिवसेनेपासून एवढे दूर जाऊ शकतील असे वाटले नव्हते परंतु ते आज या पत्रावरुन सिध्द झाले आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नियुक्ती केलेल्या नेतेपदाला त्यांच्या जाण्यानंतर कोणतीही किंमत राहिली नसल्याने व वेळोवेळी होणारा अपमान असह्य झाल्यामुळे माजी मंत्री रामदास कदम यांनी आज नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज पाठवलेल्या राजीनामा पत्रात रामदास कदम यांनी पुढे असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरे आपल्या कार्यबाहुल्यामुळे व्यस्त असतांना शिवसेना नेत्यांना कधीही विश्वासात तर घेतले नाहीच परंतु मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम यांना वेळोवेळी अपमानीतच करण्यात आले असल्याची खंत श्री. कदम यांनी व्यक्त केली.
त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीच्या आधी अचानक मातोश्रीवर बोलावून घेतले आणि यापुढे तुम्हाला कोणीही व काहीही बोलले तरी काहीच बोलायचे नाही, मिडीयासमोर जाऊन काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, मला, शिवसेनेला आणि मातोश्रीला कोणी काहीही बोलले ना टीका केली तरी तुम्ही मिडियासमोर काहीच वक्तव्य करायचे नाही नव्हे मिडीयासमोरच कधी जायचे नाही असा आदेश दिला परंतु त्यामागचे कारण मात्र आजपर्यंत कळले नसल्याचं म्हटलं आहे. मागील तीन वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार आम्हाला असह्य होत असल्याचं सांगून ज्या ज्या वेळी शिवसेनेवर संकटं आली त्या संकटकाळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाने बघितला असल्याचं रामदास कदम यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
ते पुढे उध्दव ठाकरे यांना असंही म्हणतात की, २०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसबरोबर जेव्हा सरकार बनवत होतात त्याहीवेळी मी आपणास हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसबरोबर संघर्ष करुन हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर आघाडी करणं म्हणजे ती बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा होईल पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही, त्याचेही दु:ख माझ्या मनात आहे, बाळासाहेब असते तरीही वेळ माझ्यावर आलीच नसती आणि म्हणून मी “शिवसेना नेता” पदाचा राजीनामा देत असल्याचं रामदास कदम म्हटलं आहे.
एकूणच मागील काही दिवसांपासूनची अशांतता रामदास कदम यांनी आजच्या जड अंतःकरणातील राजीनामा पत्रातून व्यक्त करताना ती यापुढील काळातील राजकीय दिशा ही शिवसेना विरहित असावी की नसावी हे येणारा काळच दाखवून देईल असेच दाखवत अनेकांना संभ्रमित केले आहे एवढे मात्र नक्की !