
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड-किल्ले, विविध पर्यटनस्थळांवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १३ जुलै रोजी जमावबंदीचे आदेश दिले होते. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने हा आदेश मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पर्यटकांना पावसाळी वातावरणाचा मनमुराद आनंद लुटता येईल.
हवामान विभागाने गेल्या आठवड्यात जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्टचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, म्हणून हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. त्यानुसार, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ले या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने घेऊन जाण्यास आणि पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
पावसाळ्यात नदीकाठची गावे, धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील ठिकाणे, गड-किल्ले, पर्यटन स्थळे, डोंगरातून कोसळणारे धबधबे अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी जाणार असाल तर गावातील वाटाड्याची मदत घ्यावी असे जिल्हाधिका-यांनी सुचविले.