दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:नवीन राज्य सरकारने थेट जनतेतून नगराध्यक्ष पद निवडले जाणार असल्याची घोषणा केल्याने अनेकांचे नगराध्यक्ष बनण्याचे स्वप्न भंगले आहे. याआधी ज्याचे नगरसेवक जास्त त्यांचा नगराध्यक्ष, हे समीकरण असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपले नगरसेवक जास्तीत जास्त कसे निवडून येतील, याकडे लक्ष केंद्रित केले होते. तसेच नगरसेवक पदाच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होणार होते. त्यामुळे कदाचित पुढचा नगराध्यक्ष मीच या अविर्भावात अनेक इच्छुक उमेदवार वावरत होते.
मात्र, आता नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय घेतला गेल्याने शहरात असलेल्या एकण ४४ हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी मोठी यंत्रणा व सोबतच प्रचंड प्रमाणात लागणारा पैसा यामध्ये आपण कमी पडणार, याची जाणीव असल्याने नगराध्यक्ष पदाची स्वप्ने बघणाऱ्या अनेकांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.. थेट नगराध्यक्ष पदाच्या दोन वेळा झालेल्या निवडणुकीत देगलूरच्या मतदारांनी काँग्रेसलाच कौल दिला होता.
