
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील यापूर्वी वगळलेला काही महत्वाचा भाग समाजसेवक सुरेश काळे यांच्या तीव्र आक्षेपानंतर पुन्हा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा आनंद व्यक्त केला जात आहे.
परभणी शहर महानगरपालिकेच्या आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने नव्याने प्रभाग रचना करण्यात आली. परंतु त्यावेळी प्रभाग क्रमांक ५ मध्ये येणे अपेक्षित असलेला पश्चिमेकडील १०० फुटी रस्त्यालगतच्या माऊली प्रोव्हीजन पासून व्हाया उघडा महादेव मंदीरासमोरुन सोमनाथ सायकल रिपेयरिग शॉप ते वृंदावन कॉलनी, नंदनवन कॉलनी, कपिल नगर रोड ते वाघ यांचे किराना दुकानापासू ते दिलीप गिराम निवास पुढे लोखंडी पूलापासून सुंदराबाई नगर ते एमआयडीसी एरिया पर्यंतचा विभाग प्रभाग क्रमांक ४ मध्ये जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आला होता.
तथापि महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून झालेली ही चूक समाजसेवक सुरेश काळे यांच्या तात्काळ लक्षात येताच त्यांनी आपला आक्षेप नोंदवत तीव्र विरोध केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी लेखी तक्रार दाखल करुन जो पर्यंत वगळलेला हा भाग क्र.५ मध्ये समाविष्ट केला जात नाही तोपर्यंत निवडणूका होऊ देणार नाही असा जणू निर्वाणीचाच इशारा दिला. परिणामी अगोदरच टीकेचे लक्ष्य बनलेले नगर रचना विभाग व मनपा प्रशासनाला नाईलाजाने का होईना परंतु अगोदर घेतलेला निर्णय बदलून सुरेश काळे यांनी जसे निर्देशीत केले अगदी तसेच करणे भाग पडले. अखेर श्री. काळे यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना भरीव यश आले आहे. त्यामुळे काळे यांचे कार्यकर्ते, महिला आघाडी व जनतेत पूरता आनंद व्यक्त केला जात आहे.