
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनीधी-रामेश्वर केरे
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “हर घर तिरंगा” उपक्रम लोकसहभागाच्या साथीने जिल्हा प्रशासनकडून व्यापक प्रमाणात राबिण्यात येत आहे. दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने राष्ट्रप्रेम वृद्धींगत व्हावे म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस उपअधिक्षक प्रकाश चौघुले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. दयानंद मोतीपोवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोखरे, डॉ. ओम रामावत, गट विकास अधिकारी, पैठण अशोक कायंदे, सहायक आयुक्त नगरपालिक प्रशासन, सोफी एच.ए., उपशिक्षण अधिकारी, विक्रम सरगर, जिल्हा अभियान व्यवस्थापक, यांच्यासह सर्व नगरपालिका मुख्यधिकारीआणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वय डॉ. आनंद देशमुख यांच्यासह विविध कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.
गावागावात लोकसहभागाने हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गाव, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्यासह लोकसहभागाच्या माध्यमातून यशस्वी करणार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सर्व प्रतिनिधी या उपक्रमात सहभाग घेणार असल्याचे गटणे यांनी सांगितले.
दरवर्षी जिल्ह्याच्या काना-कोपऱ्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी रॅली द्वारे राष्ट्रप्रेम जागृत करतात. अमृत महोत्सवी वर्षाच्या दृष्टिने व्यापक जनजागृती करून राष्ट्राप्रती कर्तव्य भावनाही निर्माण करतील. “हर घर तिरंगा”साठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जिल्ह्यातील सर्व शाळा, शिक्षकवृंद योगदान देतील, असा विश्वास श्री. गटणे यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेतर्फे स्वतंत्र व्यवस्था असून सर्वांचा सन्मानाने सहभाग घेतला जाणार असल्याचे सांगितले.
महानगरपालिका व नगरपालिका मध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या, एकूण कुटूंब संख्या लक्षात घेऊन तिरंगा ध्वजाचे नियोजन केले जात आहे. महानगरपालिकेतर्फे तिरंगा ध्वज विक्रीचे वितरण केंद्र तयार करून नागरिकांना ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत तिरंगा झेंडा उपलब्ध करुन देणात येणार आहेत. याबाबतची खरेदी प्रक्रिया संबंधित विभागाने पूर्ण करुन “हर घर तिरंगा” उपक्रम यशस्वी करावा, त्याबरोबर शासकीय विभाग प्रमुखांनी या उपक्रमांत सहभागी होण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या.