
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
मिलींद नार्वेकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा; जनतेची मागणी
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
आंध्र प्रदेशातील तिरुपती-तिरुमला देवस्थानाच्या सुरक्षा यंत्रणेकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती जप्त करण्याचे नव्हे कृती अंमलात आणण्याचे आदेश दिल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आंध्र सरकारच्या आदेशानुसारच ही कृती केली जात असावी अन्यथा सुरक्षा यंत्रणा असे काही करु शकेल असे मुळीच वाटत नाही. याचाच अर्थ आंध्र सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे वावडे आहे की काय, अशीच आता शंका येऊ लागली आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या अशा कृतीचा जाहीर निषेध करुन मिलिंद नार्वेकर यांनी देवस्थान कमिटीच्या सदस्यपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जनतेतून आता पुढे येणे स्वाभाविक आहे.
जागतिक स्तरावर सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपती-बालाजीला संबोधले जाते आहे. त्यांच्या दर्शनासाठी केवळ भारत देशच नव्हे तर जागतिक स्तरावरुन लाखो भक्त येत असतात. महाराष्ट्रातूनही प्रतिवर्षी हजारो भक्त दर्शनासाठी जात असतात. काही भक्त रेल्वेने जातात तर काही विमानाने जातात. त्यापैकी काही आपली स्वता:ची खासगी वाहने घेऊन जातात. त्या वाहनांमध्ये कोणी श्री गणेशाचा फोटो किंवा मूर्ती ठेवतात तर कोणी शिर्डीच्या साईबाबांना स्थानापन्न करतात. तसेच एका भक्ताने आपल्या वाहनामधील दर्शनी भागावर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, श्री गणेश आणि पंढरीच्या विठ्ठल-रखुमाईला श्रध्दास्थान मूर्त्यांच्या रुपाने गम लावून स्थानापन्न केले होते. तो भक्त आपल्या परिवारासह तिरुपती दर्शनासाठी गेला असता पर्वताच्या प्रारंभी चेकिंग स्थानी त्याची गाडी सुरक्षा यंत्रणेने रोखून धरली व शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मागणी केली. क्षणभर गोंधळलेल्या त्या भक्ताने आमचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपतींचीच तुम्ही मागणी करत आहात असे विचारले. त्यावेळी संबंधित सुरक्षा रक्षकाने वरिष्ठांकडे इशारा करत त्यांच्या आदेशानुसार ही मूर्ती जप्त करणार असे फर्मान सोडले. त्यावर रागावलेल्या भक्ताने तात्काळ गाडीच्या खाली उतरुन त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यानेही ही मूर्ती आम्ही जप्त करणार असे सांगू ती तुम्ही वर नेऊ शकणार नाही असे सूचित केले. आपण ज्या दैवताला पूजतो, भिजतो, ती मूर्ती हे लोक कुठे तरी अडगळीत टाकून विटंबना करतील, हे त्या भक्तांच्या पूरते ध्यानी आले आणि म्हणूनच त्याने हात जोडत, विनंती करत ती मूर्ती वरती न ठेवता खाली लपवून ठेवतो असे सांगितले. अखेर त्यात आलेले यशस्वी नंतर त्याने आपल्या भावनेतून व्यक्त केले. परंतु शिवाजी महाराजांच्या मूर्ती साठीच त्या सुरक्षा यंत्रणेने एवढा आटापिटा का केला असावा ? वारंवार विचारणा करुनही कोणतेच सबळ कारण न सांगता ती यंत्रणा शिवाजी महाराजांबद्दल एवढा अट्टाहास का आणि कोणाच्या आदेशानुसार होता हेच कळण्यासारखे नव्हते परंतु ती सर्व कृती चीड आणणारीच होती. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेली राजकीय अस्थिरता ध्यानी घेऊन आणि अशा रितीने शिवसेनेचे मावळे येथे जमा होऊन कदाचित तेथेही दुसरी गुवाहाटी निर्माण होऊ नये, किंवा महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता तेथील सरकारला खतपाणी घालणारी तर ठरणार नाही ना, अशी भीतीही वाटणे स्वाभाविक असावे.
दरम्यान ते काही जरी असले तरी केवळ आणि केवळ शिवाजी महाराजांचीच मूर्ती जप्त करणे म्हणजे हा महाराजांप्रति असलेला आकस आणि वावडेपणाची कृती निषेधार्ह अशीच म्हणावी लागेल. कोणतीही सुरक्षा यंत्रणा असो वा पोलीस, शासनाच्या आदेशानुसारच ती वागत असते, हे कोणीच नाकारु शकणार नाही. मग हे सारे आंध्रप्रदेश सरकारनीच घडवून आणले असावेत का ? का आणि कशासाठी सुरु असेल ते ? याची चौकशी होणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर तिरुपती देवस्थानच्या व्यवस्थापकीय कमिटीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चिठ्ठी मुळे सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या मिलिंद नार्वेकरांनी सुध्दा या घटनेचा तीव्र निषेध करुन सदस्यपदाचा राजीनामा द्यावा, ही मागणी भक्तगण जनतेतून पुढे येणे स्वाभाविक आहे.