दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
===================
इंदापूर, : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक शिकावू विमान कोसळल्याची घटना घडली आहे. शिकाऊ विमान एका शेतात कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात पायलट मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात तालुक्यात कडबनवाडी इथं ही घटना घडली आहे. आज सकाळी कडबनवाडी इथं हे विमान दादाराम आबाजी बाराते यांच्या शेतात कोसळले. या अपघातात पायलट तरुणी किरकोळ जखमी झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. बारामती येथील हे शिकाऊ विमान घेऊन तरुणी सराव करत होती. पण तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात एका शेतात कोसळले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. विमान पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.
आज सकाळी 11:20 ते 11:30 वाजेदरम्यान कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी गावाच्या हद्दीत कोसळले. यामध्ये शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड (वय २२ वर्ष रा. पुणे) या किरकोळ जखमी झाल्या. त्यांना औषध उपचार करून शेळगाव येथील नवजीवन हॉस्पिटल शेळगावमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. घटनास्थळी कारवार एव्हिएशनचे कर्मचारी हजर आहे.
