
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वापरासाठी असलेल्या इमारती, वर्गखोल्या आणि सभागृह शैक्षणिक वापराव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामकाजासाठी वापरण्यात येऊ नये. पूर्वी खासगी कार्यक्रम, लग्न समारंभ बारसे, मोठा वाढदिवस इ. कामासाठी ह्या शाळांचा सर्रास वापर होत होता. त्यामुळे शाळा विनामूल्य व भाडेतत्त्वावर देण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट आदेश पालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
पालिकेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण विभागामार्फत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शहरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. शैक्षणिक वापराकरिता असलेल्या इमारतीमध्ये अनेक ठिकाणी आधारकार्ड केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रही सुरू आहे. काही इमारती खासगी वापराकरिता देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थी व पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.