
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे राज्यात झालेले सत्तांतर राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकेल का नाही, हा भाग वैचारिक पातळीला हेलकावे देणारा ठरत असला तरी सध्या तरी पक्ष फूटीला ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक पक्षांतून कोणी ना कोणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देऊन त्यांच्या गोटात सामील होताना दिवसागणिक दिसत आहे. त्याचाच परिपाक म्हणून आज छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित जाहीर सभेत परभणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख माणिक पोंढे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख तथा जिल्हा उपप्रमुख म्हणून शिवसेनेची धुरा आजतागायत सांभाळणारे माणिक पोंढे यांना परभणी शिवसेनेत अशी कोणती घुसमट सोसावी लागत होती, ज्यामुळे त्यांना शिंदे गटाचा आधार घेणे भाग पडले असावे, अशी चर्चा परभणीत सर्वत्र ऐकावयास मिळते. किंबहुना तोच धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी सुध्दा असेच पदाधिकारी, कार्यकर्ते व नेतेही हेरण्याचे काम जोमाने सुरु केले आहे.
शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, ज्यामध्ये आजी माजी आमदार, खासदार यांच्या भेटी व आशीर्वाद घेण्यावरही श्री शिंदे यांनी भर देत अधिकाधिक मानवीय शक्ती वाढवण्यावर भर दिला आहे. जेणेकरुन संसदीय व न्यायालयीन लढाई जिंकणे सोयीची होऊ शकेल याचे आराखडे नि गणिते विविध मार्गाने मजबूतीकरणावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. १ आणि ८ जुलैची लढाई जिंकता यावी यासाठीची लढाई येणकेणप्रकारे जिंकता यावी साठीची ती धडपड असूही शकेल. निकाल जो लागायचा तो लागेल परंतु कदाचित दोन्ही प्रकरणी तारीख पे तारीख करीत त्या प्रकरणांतील हवाही काढली जाईल यासाठीचे प्रयत्न निश्चितच चालविले यात शंकाच नसावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांचा आशीर्वाद मौलीक ठरला जाईल अशीही दाट शक्यता असल्यानेच एकनाथ शिंदे मुळीच धास्तावलेले दिसत नाहीत.
काही दिवसांपूर्वी कळमनूरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर, त्यानंतर पूर्णा पं.स.चे उपाध्यक्ष तथा शिवसेना पदाधिकारी श्री कदम, आणि आज परभणी विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा जिल्हा उपप्रमुख माणिक पोंढे यांनी शिंदे गटात जाऊन उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला परभणीत ही गळती लागल्याचे दाखवून दिले आहे.