
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
————————————–
परभणी : रस्त्याने पायी प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठन हिसकावून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला.
परभणीतील विद्या नगरी परिसरात सदरची घटना दिवसा ढवळ्या घडली आहे. संध्या जोशी नावाची ही महिला रस्त्याच्या एका बाजूने पायी चालत जात असता दोन मोटार सायकल स्वार भरधाव वेगाने श्रीमती जोशी यांच्या अचानक जवळ आले. घाबरलेल्या अवस्थेतील जोशी यांना क्षणभर कांहीच कळले नाही. तोपर्यंत त्या अज्ञातांनी गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून घेत पोबारा केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भेदरलेल्या जोशी जमिनीवर कोसळल्या. त्यांना किरकोळ मार लागला असल्याचे समजते.
नांदेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी शिताफीने केली जात आहे. तथापि दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. प्रवासी महिला वर्गात तर कमालीची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घरे व दुकाने फोडली जात आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले जात आहे. भूरट्या व जबरी चोर्या, भर रस्त्यात केली जाणारी लूट, खून व खूनाचे प्रयत्न असे गंभीर प्रकार सर्वत्र सुरु आहेत. त्यामुळे नागरिक, व्यापारी यांच्यात कमालीची चिंता निर्माण झाली आहे. जोपर्यंत शहरात गस्ती पथके तैनात केली जात नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारांना आळा बसू शकणार नाही. सामान्य नागरिक, व्यापारी आणि पोलीस यांच्या समन्वयातून अशी गस्ती पथके निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. तर आणि तरच मस्तवाल नि शेफारलेल्या चोरांच्या मूसक्या आवळणे शक्य होणार आहे. शिवाय नागरिक व व्यापारी वर्गाला ही पूर्णा दिलासा मिळू शकेल.