
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. राज्यात राजकीय वातावरण पटले असून, शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार एकमेकांवर टीका करत आहेत.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात शिव संवाद यात्रा करत आहेत. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करत आहेत. अशातच उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमने-सामने येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे सकाळी ७ वाजता पुण्यातल्या कात्रज चौकामध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे कात्रजमध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत.
आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, कोकण या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
दरम्यान, एकनाथ शिंदे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहेत. या सभेत एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.