
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीनंतरही आपल्या परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक संख्येने आहे. जिल्ह्यासाठी ही बाब निश्चितच लाजीरवाणी असून भविष्यात अशा प्रकारे लावले जाणारे बालविवाह रोखले जाणे अत्यंत आवश्यक असून ती काळाची गरज असल्याचे ठोस प्रतिपादन करत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी कमालीची खंतही व्यक्त केली.
अक्षदा मंगल कार्यालयात महिला व बालविकास विभाग आयोजित ‘बालविवाह निर्मूलन विषयास अनुसरुन जिल्हाभरातील सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांच्या एकदिवसीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी या नात्याने आंचल गोयल यांनी संबोधित केले. त्यावेळी जि.प.चे सीईओ शिवानंद टाकसाळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प.) संदीप घोंसीकर, सर्वश्री तुबाकले, लांडगे, सूर्यकांत कुलकर्णी व कैलास तिडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शासनातर्फे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाला अनेक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले जातात तरीही आपल्या परभणी जिल्ह्यात मात्र अजूनही ५२ टक्के बालविवाहाचे प्रमाण आहे. ज्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, त्यांनी त्यासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे असंही म्हणाल्या की, दिवसेंदिवस वाढणारे असे बालविवाह थोपविण्यासाठी शासन स्तरावरील सर्व यंत्रणांनी समन्वय राखून एकोप्याने काम करणे गरजेचे ठरणार आहे. ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका या सर्वांचा सहभाग गावपातळीवरील या कार्यात आपली जबाबदारी ओळखून एकोप्याने पार पाडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी ठणकावले.
समाजामध्ये वावरत असताना महिलांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असते. त्याचाच परिपाक म्हणून दिवसेंदिवस वाढणारी महिलांची असुरक्षितता पारिवारिक समाजाला भेडसावणारी भयान समस्या असते किंबहुना त्यासाठीच मुलगी वयात येण्या अगोदरच तिचे लग्न लावले म्हणजे नव्हे लावणे भाग पडते जणू असेच चित्र समाजमनात रुजले गेले असावे, अशी मनाला गवसणी घालणारी प्रतिक्रिया जि.प.चे सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी यांनी घातली.
याप्रसंगी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व अंगणवाडी सेविका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.