
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर
पुणे : पुणे महापालिकेत ३४ गावांचा समावेश झाला आणि सुसंस्कृत पुण्याने मुंबई पालिकेला मागे टाकत राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका होण्याचा मान पटकवला. याचवेळी पालिकेला विस्तारित कारभार झेपणार नाही, त्यामुळे पूर्व हवेलीतील गावांची मिळून “हडपसर महापालिका” नव्याने स्थापन करावी अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु, राजकीय सारीपाटावर या मुद्याकडे सोयीने दुर्लक्ष केले. २०१२ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत ११ गावांसाठीच्या प्रभाग क्र. ४२ मधून समाविष्ट गावांसाठी फक्त दोन नगरसेवक मिळाले. त्यानंतर २३ गावांचा समावेश झाल्यानंतर २०२१ च्या महापालिका निवडणुकीची चाहुल लागल्याने प्रभाग वाढतील त्यामुळे या गावांना स्थानिक नवे नगरसेवक मिळतील, अशी आशा समाविष्ट गावातील ईच्छूकांना होती. परंतु आता पुन्हा राज्य शासनाने महापालिका निवडणुकीसाठी २०११ च्या लोकसंख्येनुसार आणि चार नगरसेवकांचा एक प्रभाग ठरवून निवडणूक घेण्याचे जाहीर केले, त्यामुळे समाविष्ट गावातील नागरिकांची आणि नाराज ईच्छूकांची ज्यादा महापालिकेची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.