
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
लोहा शहरापासून अवघ्या पाच कि.मी.अंतरावर रामाचीवाडी येथील साठवण तलाव ओव्हर फ्लो होऊन फुटला.रस्ता वाहुन गेल्यामुळे नागरिकांना वाहत्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यायची मागणी ग्रा.पं.सदस्य बालाजी सांगळे यांनी केली आहे. तालुक्यातील रामाची वाडी हे छोटे गाव असून सातशे लोकसंख्येचे हाडोळी (ज.) ग्रामपंचायत अंतर्गत असून भारत देश एकिकडे स्वातंत्र्याची ७५ वर्ष मोठ्या दिमाखात पूर्ण करत असताना रामाची वाडी ग्रामस्थ अद्याप ही विकासापासून कोसो दूर आहेत.जिवंतपणी मरणयातना भोगत आहेत.
यावर्षी अतिवृष्टीमुळे रामाची वाडी येथील तलाव ओसंडून वाहत असून तलावाच्या सांडव्याच्या भींतीचे काम,पाळूचे काम अर्धवट अवस्थेत राहिल्यामुळे साठवण तलाव ओव्हर फ्लो होऊन फुटला.रस्ता वाहुन गेल्यामुळे नागरिकांना वाहत्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.शेतकरी, शेतमजूर,ग्रामस्थ,विद्यार्थ्यांना पावसाळ्यात दरदिवशी मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.अनेक जण स्वतःचा जिव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.कधी जीव जाईल याचा नेम नाही.अनेकदा लोहा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना हकिकत सांगितली प्रशासनासमोर गाऱ्हाणे मांडले तरीही सुस्त प्रशासन व मस्तवाल लोकप्रतिनिधी हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून आहेत.अतिशय जिवघेण्या प्रवासात ग्रामस्थ साखळी करून मुलं खांद्यावर घेऊन नदी पात्रातून जात आहेत.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी सुद्धा नदीनाल्यांवर पुल नाही.तरीही कठीण प्रसंगात दळणवळण होत असताना कधी जीवावर बेतल हे सांगता येत नाही.जमीन खचली,रस्ता वाहुन गेला.रूग्ण उपचारासाठी लोहा येथे न्यावे कसे? गत दोन दिवसांपचर्वी डिलेव्हरी ची महिला दवाखान्यात नेतांना बाजेवर टाकून नेतांना पुरात वाहून जाताजाता वाचली. कित्येक वेळा जनावरं वाहुन गेली.अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी फिरत आहे.अनेजण बालंबाल बचावले.समाजमाध्यमांवर अनेकांनी आवाज उठविला तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधी गप्प आहेत. तात्काळ शासनाने याकडे लक्ष देवून रामाची वाडी ग्रामस्थांच्या समस्या सोडवाव्यात व पुरात पाण्यात व तलावामुळे जर जिवीत वा वित्त हानी झाली तर संबंधित लोकप्रतिनिधी, प्रशासन व सरकार कारणीभूत असेल असा ईशारा ग्रामपंचायत सदस्य बालाजी सांगळे,सह ग्रामस्थांनी दिला.