
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला महिनाभरापेक्षा जास्त काळ झाला आहे, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही.
येत्या एक-दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दोन जण दिल्लीला चकरा मारत आहेत, पण पाळणा काही हलत नाही. आता बातमी आली की उद्या विस्तार होणार आहे.
विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार त्यांचं त्यांना लखलाभ, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. आता मी मैदानात उतरलो आहे, पळणार नाही. निष्ठा आणि पैसा अशी ही लढाई झालेली आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते.
भगव्याच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे, त्या गद्दारांचं नामोनिशाण शिल्लक राहिलं नाही, भगवा मात्र फडकत आहे. गद्दाराच्या मतदारसंघात कमळ फुलवण्याची भाषा केली जात आहे. युज ऍण्ड थ्रो केलं जातं हे यांना लक्षात येईल. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कोणी वार करत असेल तर त्याचा नायनाट करणं आपलं कर्तव्य ठरणार आहे,’ असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.