
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
गंगापूर : गंगापूर शहरात एका घरात सुरु असलेला कुंटणखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून एका पीडितेची सूटका करतानाच हा कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला अटक केली. तिच्यावर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापुर शहरातील नबाबपुर वाडी रोडवरील पांडुरंग लॉन्स शेजारी एका घरामध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गंगापूर परिसरातून महिला बोलावून वेश्या व्यवसाय चालवित असल्याची खात्रीलायक माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने गंगापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांना या ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार लोहकरे यांनी पंचासमक्ष व त्या ठिकाणी पंटर (बनावट ग्राहक) पाठवून पोलिस ठाण्याच्या स्टाफसह छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी कुंटणखाना चालविणारी महिला एका पिडीत महिलेसह आढळली. गंगापूर पोलिसांनी पिडीत महिलेची कुंटणखाण्यातून सुटका करुन कुंटणखाणा चालविणाऱ्या महिलेवर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तिला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय लोहकरे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, महिला पोलिस हवालदार जयश्री तुपे, पोलिस नाईक लक्ष्मीकांत सपकाळ, अंमलदार तुळशीराम गायकवाड, विजय नागरे, भरत घुगे, महिला पोलिस अंमलदार किर्ती पाटील यांच्या पथकाने केली.