
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
——O——O——
परभणी/औंढा : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औंढा येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथांचे दर्शन घेतल्यामुळेच त्यांना ते पावन झाले असावे असा द्र्ढ विश्वास हिंगोली, परभणी, नांदेडच्या नागरिकांनी व्यक्त केला आहे, नव्हे तसं म्हटलं तर मुळीच वावगं ठरु नये.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार, दि. आठ ऑगष्ट २२ रोजी नांदेड, हिंगोलीच्या दौऱ्यावर आले होते. विविध नागरी विकास कामांची उद्घाटने, कांही ठिकाणी विविध उपक्रमांबरोबरच त्यांनी पूरसद्रष्य परिस्थितीचीही पाणी केली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे, पिकांचे अतोनात नुकसान झाले त्या ठिकाणी व संबंधित शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा देण्याचे कामही केले. कांही देवस्थानांना भेटी देवून मनोभावे दर्शन घेतले. दुसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून त्यांनी रात्रौ दहा वाजता औंढा येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथांचे दर्शन घेतले. मनोभावे पूजा-अर्चा, अभिषेकही केला. मनोभावे केलेली ती पूजा व अभिषेकच मुख्यमंत्री शिंदे यांना पावन झाला आहे, नामदार यांच्या सेवावृत्तीने देवाधि देव श्री नागनाथांची केलेली पूजा हीच सर्व संकटांना दूर करणारी व त्यांना समस्यांतून तारणारी ठरली असावी आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी झालेला शपथविधी अगदी निर्विघ्नपणे पार पडला आहे, ही त्याची प्रचिती दिसून आली.
या प्रसंगी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र बापळकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, मंदीर देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुडे, उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख, माजी सभापती अनिल देशमुख आदीजन उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक एम्. राकेश कलासागर व त्यांचे सहकारी आणि पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. एकूणच काय तर “मुख्यमंत्री एकनाथांनी औंढ्याच्या नागनाथांचे घेतलेले दर्शन फलदायी ठरले एवढे मात्र नक्की !