
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
——०—–०—-
परभणी : दरमहा चोवीस हजार रुपये फिक्स वेतनश्रेणी देऊन गट प्रवर्तकाला कायम स्वरुपी नोकरी देण्यात यावी अन्यथा देशपातळीवर जेल भरो आंदोलन उभारले जाईल असा निर्वाणीचा इशारा आयटक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मुगाची बुरुड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच एक दिवसाचे धरणे आंदोलन करुन आपल्या पुढील आंदोलनाविषयीची चुणूक दाखवत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी हा इशारा देण्यात आला.
सुमारे साडे तीन हजार गट प्रवर्तक राज्य पातळीवर कार्यरत असून देश पातळीवर ती संख्या सुमारे पंच्याहत्तर हजारांपर्यंत जाते. मागील अनेक कालावधीपासून अगदी तुटपुंज्या मानधनावर हेच गट प्रवर्तक काम करीत आहेत. परंतु गगनाला भिडलेली महागाई, अन्न धान्यावर लावली जाणारी जीएसटी, अनावश्यक वाढवलेले जीवनोपयोगी वस्तूंचे दर हे सारे असह्य्य असतांना मानधन मात्र अगदी तुटपुंजे मिळत आहे. परिणामी कमरमोड ठरणा-या या महागाईच्या काळात समस्त गट प्रवर्तक आणि त्यांचा परिवार पूर्णपणे बेचैन होऊन तो कमालीचा मेटाकुटीला आला आहे. त्याचाच परिपाक म्हणून प्रत्येक गट प्रवर्तकाला रुपये चोवीस हजारांची वेतनश्रेणी फिक्स करुन कायम स्वरुपी नोकरी देण्यात यावी, अन्यथा केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर जेल भरो आंदोलन लवकरच छेडले जाईल असा गंभीर इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी देण्यात आला.
एक दिवसाचे धरणे आंदोलन ही एक झांकी असून जेल भरो आंदोलन अभी बाकी है असे सांगून कितीही काम आणि तुटपुंजे वेतन हे यापुढे चालणार नसून कायम नोकरी व रुपये २४ हजार एवढे फिक्स वेतन मिळालेच पाहिजे. ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही, ते काम यापुढे केले जाणार नाही, अनाठायी लादलेली कामे कमी केली जावी अशा मागण्या मान्य कराव्यात अन्यथा लवकरच जेल भरो आंदोलन छेडले जाईल, असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.