दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:देगलूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील अल्लापूर, तडखेल, खानापूर, कावळगाव, इब्राहीमपूर, मैदनकल्लूर, हनुमान हिप्परगा नरंगल, शहापूर, लिंबा, शेळगाव, नंदुर, तमलूर, शेवाळा, भायेगाव, चैनपूर, बागन टाकळी, केदारकुंठा, मरखेल, माळेगाव, किनी यासह अन्य काही गावातील वक्फ मिळकतीच्या जमिनी आहेत. मशिदी, अनाथालय, आशूरखाना, कब्रस्तान यासह भाडेपट्ट्याने दिलेल्या अन्य रिकाम्या जागांची सातबारा उताऱ्यावर केवळ वक्फ संस्थेच्या नावाची नोंद करावी तसेच इतर हक्कात वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अनिस शेख या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी डॉ. विपीन इटनकर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व तहसिल कार्यालयास दिल्या आहेत. यासंदर्भात संबंधित मंडळ अधिकारी -तलाठी सज्जामध्ये अशी नोंद घेण्याचे काम चालू आहे. देगलूर शहरात वक्फ मंडव्याची जवळपास साडेचारशे एकर तर ग्रामीण भागात सव्वाशे
एकर पेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे दिसून येत आहे. १९९५ साली केंद्र सरकारने वक्फ अधिनियम हा केलेला कायदा देशभरात लागू झाला. त्यानुसार प्रत्येक राज्यात वक्फ मंडळाचे गठन करण्यात आले. या कायद्यातील तरतुदीनुसार एखादी मालमत्ता वक्फ मंडळाची आहे किंवा कसे हे ठरविण्याचे अधिकार राज्य वक्फ मंडळालाच आहेत. तसेच हा कायदा अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वी एखादी वक्फ मालमत्ता अन्य कोणत्याही कायद्यांतर्गत नोंद झाली असल्यास ती देखील या कायद्याखाली नोंद करण्यात आली आहे. असे मानण्यात येणार आहे. वक्फ मंडळाने काढलेल्या पत्रकानुसार गाव पातळीवरील वक्फ मालमत्तांची देखभाल करणाऱ्या मुतवल्ली किंवा अन्य कोणत्याही खासगी व्यक्तीचे नाव, गाव नमुना सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यात येऊ नये. अशी नावे आधीपासून अस्तित्वात असल्यास ती काढून केवळ वक्फ संस्थेचेच नाव टाकण्याचे सूचित केले आहे. यासंदर्भात तहसीलदार राजाभाऊ कदम यांना प्रस्तुत प्रतिनिधीने विचारणा केली असता वक्फच्या सूचनांचे पालन करण्यात येत असून याबाबतीत संबंधित सज्जांचे तलाठी व मंडळ अधिकारी काम करीत असल्याचे सांगितले. देगलूर शहर तसेच ग्रामीण भागातील काही वक्फ मालमत्ता काही वर्षांपूर्वी भाडेपट्ट्याने देण्यात आल्या होत्या. तसेच येथील दर्गा परिसरातील वक्फ मंडळाच्या जागेवर अनेक कब्जेदार किंवा अतिक्रमण झाले आहेत. काही ठिकाणी अशा जागेवर मोठ्या आणि पक्क्या घरांचे बांधकाम देखील झाले आहे. शहराच्या विविध भागातील काही जागा विकसित करून त्यांची प्लॉटिंग करून अनेकांना विक्री करण्यात आलीआहे. काही शेतजमिनीवर अनेक वर्षांपासून मोठ्या संख्येने कब्जेदार आहेत. काही जागेवर शैक्षणिक संस्था उभारल्या आहेत. सध्यातरी वक्फ मंडळाकडून केवळ सातबारा उताऱ्यावर आपल्या स्वामित्वाची नोंद घेण्याच्या सूचना आहेत. परंतु भविष्यात कब्जेदारांना हटविण्याची कारवाई झाल्यास विकट समस्या उभी राहू शकते.
