
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर .
पुणे : टेस्लाचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क अनेकदा त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. ट्विटरवर मस्क यांचे अनेक मित्र आहेत. चार वर्षांपूर्वी मस्क यांची एका भारतीयाशी मैत्री झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. एका ट्विटवरून सुरू झालेला संवाद हळूहळू वाढू लागला. अखेर आता दोघांची भेट झाली. प्रणय पाठोळे असं या तरुणाचं नाव असून तो पुण्याचा आहे. प्रणयने बिझीनेस एनालाॅटिक्समध्ये मास्टर ऑफ सायन्सचे शिक्षण घेतले आहे. त्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस मध्ये काम केले आहे. अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून परिचित आहेत.
२०१८ मध्ये प्रणय पाठोळे यांनी टेस्लाच्या ऑटोमॅटिक विंडस्क्रीन वायपर आणि पावसावेळी त्यात निर्माण होणाऱ्या समस्येबद्दल ट्विट केलं होतं. या ट्विटला मस्क यांनी उत्तर दिलं. पुढच्या लॉन्चवेळी ही समस्या सोडवू, असं मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मस्क अनेकदा प्रणयच्या ट्विटवर कमेंट करायचे. यानंतर डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातूनही दोघांमध्ये बातचीत व्हायची. आता प्रणयनं मस्क यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रणय पाठोळे हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या सोबत अगदी आत्मविश्वासानं उभा असलेला दिसत आहे.
इलॉन मस्क यांच्यासोबतचा फोटो प्रणयनं ट्विट केला आहे. त्यांनी या फोटोमध्ये मस्क यांना टॅग केलं आहे. गीगाफॅक्ट्री टेक्सासमध्ये तुमच्यासोबत झालेली बैठक उत्तम होती. या जगात त्यांच्यासारखी उदार व्यक्ती पाहिलेली नाही. तुम्ही कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणा आहात, असं प्रणयनं ट्विटमध्ये नमूद केलं आहे. या ट्विटमध्ये प्रणयनं अनेक हार्ट इमोजी वापरले आहेत. टेक्सासमध्ये दोघांची भेट नेमकी का झाली, त्यामागचं कारण काय, ते अद्याप समजू शकलेलं नाही.