
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर;शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या बसस्थानकाची इमारतीअभावी दुरवस्था झाली असून, ४० वर्षांच्या कार्यकाळात फक्त छतावरील टिनपत्रे बदलण्याव्यतिरिक्त काहीच विकास झाला नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या या बसस्थानकापासून दवाखाने, बाजारपेठ, शाळा व कॉलेज यासोबतच शासकीय कार्यालये जवळच असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांसह शेजारील कर्नाटक व तेलंगणा राज्यातील प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार म्हणून देगलूर आगाराची ओळख आहे. मात्र योग्य इमारतीअभावी या बसस्थानकाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली. मागील ४० वर्षांच्या कार्यकाळात फक्त छतावरील टिन पत्रे बदलण्याशिवाय काहीच विकास केला गेल्या नाही. येथे प्रवाशांना बसण्यासाठी आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पंखे, तसेच रात्रीच्या वेळेस लाइटची व्यवस्था आदी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे स्वच्छतागृहाअभावी महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.
बसस्थानकाच्या बांधकामासाठी शासनाकडून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एकूण दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. व त्या दृष्टीने कामाला सुरुवातही झाली होती. मात्र, राजकीय लोकांचा वाढता हस्तक्षेप व कोरोनाकाळ यामुळे थांबलेले काम अध्यापही थंड बस्त्यात पडले आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.स्वच्छतागृहानिमित्त
प्रवाशांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन येणाऱ्या पंधरा दिवसांच्या आत तात्पुरत्या स्वरुपात स्वच्छतागृहाची सोय करण्यात येईल असे -संजय आकुलवार, आगारप्रमुख, देगलूर यांनी विचारपूस केले तेव्हा त्यांनी सांगितले.