
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
• देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करण्याकरिता ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाचा उत्सव साजरा केला जात आहे. हा महोत्सव भारताच्या आजपर्यंतच्या प्रवासात मौलिक योगदान देणाऱ्या भारतीयांना समर्पित केलेला आहे. म्हणूनच स्वातंत्र्यसेनानी व स्वातंत्र्योत्तर काळातील नेते आणि शास्त्रज्ञ यांच्याप्रती या प्रस्तावाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी याठिकाणी उभा आहे.
• सर्वप्रथम देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, स्वातंत्र्योत्तर काळातील नेते, शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रात प्रगती साधणाऱ्या ज्ञात-अज्ञात मान्यवरांना मी अभिवादन करतो.
• छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य ही स्वातंत्र्याची मुहुर्तमेढ ठरली आहे.
• आपल्या देशाने १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम, लोकमान्य टिळकांनी संपूर्ण स्वराज्यासाठी केलेली जनजागृती, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने केलेल्या अनेक चळवळी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान, राजगुरु, सुखदेव आणि भगतसिंग यांसारख्या अनेक क्रांतीकारकांच्या बलिदानातून भारताचे स्वातंत्र्य उदयास आले आहे.
• देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यानिमित्त राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
• देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये या राज्याचा प्रमुख म्हणून मला ध्वजवंदन करण्याचे भाग्य लाभले ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
• भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात, महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, महाराष्ट्र या अभियानात उत्साहाने सहभागी झाला.
• अनेक अडथळे आणि आव्हाने पार करुन भारत देशाने अचंबित करणारी यशोगाथा साकारली आहे. ही यशोगाथा म्हणजे आपल्याला अभिमानास्पद वाटणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि अर्थव्यवस्था विषयक बाबींची एक अखंड मुर्ती आहे.
• भारत देश जगातले सगळयात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला समानता, एकता आणि बंधुता या मुल्यांची जपणूक करणारी जगातील सर्वात मोठी लिखित स्वरुपातील घटना दिली आहे.
• भारताने जगाला शांततेचा मंत्र दिला आहे. जगात शांतता नांदावी आणि सर्व देशांना विकासाची संधी उपलब्ध व्हावी असे भारताचे धोरण राहिले आहे.
• १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर साडे सात दशकांचा कालावधी लोटला आहे. या साडेसात दशकांच्या कालावधीत भारत देशाने सर्वच क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
• प्रारंभीच्या काळात अपूरी साधने, निधीची कमतरता आणि इतर देशांनी तंत्रज्ञान देण्यास दिलेला नकार अशी पार्श्वभूमी असतानाही अणूऊर्जा, अवकाश, औषध निर्माण, संरक्षण अशा विविध क्षेत्रात भारताने नवतेच्या (इन्होव्हेशन) सहाय्याने आपली क्षमता सिध्द केली आहे.
• भारताने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली घौडदौड लाखो भारतीय नागरिकांचे स्वातंत्र्य समृध्द करणारी ठरली आहे.
• विशेषत: भारतातल्या तरुणाईला बळ देण्याचे आणि तिच्या पुढे प्रगतीची नवी क्षितीजे, नवी स्वप्ने आणि आशा आकांक्षा ठेवण्याचे काम याच तंत्रज्ञानाने केले आहे.
• कोणत्याही राष्ट्राचे सामर्थ्य हे त्या राष्ट्रातील मनुष्य बळाचे कौशल्य, आधुनिक आणि अद्यावत शस्त्र सामुग्री आणि संशोधन व विकास क्षेत्रातील प्रगतीवर अवलंबून असते. स्वातंत्र्योत्तर काळात या सर्व बाबींचा विचार करुन समतोल विकास साधला गेला आहे.
• भारत देशाने अन्न, कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, ऊर्जा, व्यापार अशा मूलभूत क्षेत्रात देशातील जनतेला किमान सुरक्षा मिळेल अशी हमी देण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.
• देशातील उद्योजक, विद्वान, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, प्रशासक, डॉक्टर, सैन्य दलातील जवान आणि कोट्यावधी शेतकरी यांनी देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान दिले आहे.
• वैद्यकीय क्षेत्राने आरोग्य क्षेत्रात दिलेल्या सेवेमुळे भारतीय जनतेचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे झाले आहे. भारताने आधुनिक वैद्यकीय विज्ञानात महत्वाचे योगदान दिले आहे.
• आज भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अग्रेसर आहे. ही बाब आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे. जागतिक महासत्तेकडे मार्गक्रमण करीत असलेल्या भारत देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याने मोठे योगदान दिले आहे.
• महाराष्ट्र हा देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन आहे. महाराष्ट्राने उद्योग, सहकार, ऊर्जा, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात केलेले कार्य केवळ अद्वितीयच नाही तर देशातील इतर राज्यांसाठी दिशादर्शक ठरले आहे.
• राज्याने प्रगतीची शिखरे गाठताना वंचित आणि उपेक्षित वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेली प्राथमिकता हेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे द्योतक आहे.
• महाराष्ट्र हे उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. देशातील सर्वात जास्त विदेशी गुंतवणुक महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील उत्तम पायाभूत सुविधांना दिलेली ती पोच पावती आहे. नागरीकीकरणाचा वेग वाढत असताना नगरे मूलभूत सोयी सुविधांनी युक्त आहेत.
• सिंचनाच्या प्रकल्पाने केवळ महाराष्ट्राची तहान भागविली नाही तर कृषी विकासाला गती दिली आहे. सहकारी चळवळीने महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे चित्र बदलले आहे.
• वंचित उपेक्षित घटकांबरोबरच महिला आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याने राबविलेल्या कल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. पुरोगामी विचारांचे महाराष्ट्र हे राज्य महिला धोरण आखणारेही पहिले राज्य आहे.
• देशाच्या आजवरच्या प्रगतीशील वाटचालीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाच्या विकासात प्रगत राज्य म्हणून ओळख असलेला महाराष्ट्र भविष्यातही अग्रेसर राहील असा निर्धार आपण यानिमित्ताने करुया.
• भारताचा गेल्या 75 वर्षांचा हा प्रवास निश्चितच गौरवास्पद आहे. देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली असून सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील प्रगती आज जागतिकस्तरावर कौतुकास पात्र ठरली आहे. संपूर्ण देशात आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध अभिनव उपक्रम राबविले जात आहेत.
• राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची दि. 12 मार्च 2021 पासून सुरुवात झाली, मुंबई, पुणे व वर्धा येथे एकाच दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आले, 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हे उपक्रम सुरु राहणार आहेत. या उपक्रमांतर्गत, आतापर्यंत नदी महोत्सव, घरोघरी तिरंगा, स्वराज्य महोत्सव व इतर उपक्रम राबविण्यात आले.
• स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्याने दर्जेदार आरोग्य, सामाजिक न्याय, सामाजिक सलोखा, कौशल्य विकास, युवा शक्ती, अर्थ साक्षरता, माहिती तंत्रज्ञान, सुशासन, रोजगार निर्मिती, चिरंतन विकास, महिलांचा वाढता सहभाग, माझी वसुंधरा, पर्यटनास अधिक संधी, सांस्कृतिक निर्देशांक वाढ, या क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. आणि या क्षेत्रांमध्ये अधिक प्रगती साधण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
• या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात हेरिटेज वॉक, सायकल रॅली, पथनाट्य, महानाट्य, लोककला, लोकसहभागातून कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रगतीपथावरील महाराष्ट्र, चर्चासत्रे, परिसंवाद, मेळावे, प्रदर्शने, दृक-श्राव्य, समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी आदी कार्यक्रम राबविले जात आहेत.
• ‘घरोघरी तिरंगा’ सारखा उपक्रम देशासह राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या घरांवर देखील राष्ट्रध्वज डौलाने फडकवले. त्यामाध्यमातून राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करण्याबरोबरच स्वातंत्र्यलढ्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ‘घरोघरी तिरंगा’ अभियान फलदायी ठरले, याचा मला विश्वास वाटतो.
• तरुण पिढीला देशाच्या स्वातंत्र्यलढ्याविषयीची माहिती व्हावी, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारकांच्या कार्याला उजाळा मिळावा, यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान झालेल्या स्वराज्य महोत्सवामुळे राज्यभर वातावरण भारावून निघाले.
• स्वराज्य महोत्सवांतर्गत राज्यभर प्रशासकीय यंत्रणा, शाळा-महाविद्यालये, विविध सामाजिक संस्थांनी उत्साहाने भाग घेऊन प्रभातफेरी, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, मॅरेथॉन, ऐतिहासिक इमारतींवर आकर्षक रोषणाई असे उपक्रम राबवून वातावरण निर्मिती केली.
• अनेक ठिकाणी त्या-त्या भागातील स्वातंत्र्य सैनिकांविषयी माहिती देणारे चित्रप्रदर्शने देखील आयोजित करण्यात आले.
• राज्यभरातील विविध धरणांच्या विसर्गावर तिरंगी विद्युत रोषणाई करुन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सलामी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वराज्य महोत्सवामध्ये राज्यभरातील जनतेच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महोत्सव आणि त्यामागील संकल्पना यशस्वी ठरली आहे.
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा आणि विचारांचा, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले अशा समाज सुधारकांच्या ध्येयाचा आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रसंगी ब्रिटीशांच्या गोळया अंगावर झेलणाऱ्या राष्ट्रभक्तांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे.
• स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना देशाबरोबरच महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात घेतलेली भरारी अभिमानास्पद आहे. या राज्याचा हा नावलौकिक असाच उंचावत राहावा यासाठी आपण सारेजण पक्षभेद विसरुन एकत्र येऊन महाराष्ट्राला देशातील सर्वच आघाड्यांवर प्रगतीपथावर नेण्यासाठीचा संकल्प यानिमित्ताने करुया. पुनश्च एकदा मी स्वातंत्र्यलढ्यातील सेनानींना मी अभिवादन करतो आणि राज्यातील जनतेला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देतो.
जयहिंद, जय महाराष्ट्र…
राज्यात आतापर्यंत संपन्न झालेले महत्त्वाचे कार्यक्रम-
• मुंबई येथील नदी महोत्सव कार्यक्रम
• दिल्ली येथील राजपथावर जैवविविधता या विषयावर चित्ररथ
• कोल्हापूर येथील महा ताल महोत्सव
• राज्यातील 36 कारागृहात एकाच वेळी विशेष कार्यक्रम
• झाडीपट्टी महोत्सव
• जळगाव येथील वहिगायन महोत्सव
• अकोला येथील मुशायरा महोत्सव
• चोंडी जि. अहमदनगर येथील अहिल्यादेवी जयंती निमित्त कार्यक्रम
• सिंदखेड राजा जि. बुलढाणा येथील जिजाऊ जयंती निमित्त कार्यक्रम
• मुंबई येथील एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम
• दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे कार्यक्रम
• आंतरराष्ट्रीय योग दिवस – जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर
• समाधी संजीवन निमित्त आळंदी येथे कार्यक्रम
• पंढरपूर संत नामदेव महाराज यांची साडेसातशेवी जयंती कार्यक्रम
• संत निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई यांच्या 725 व्या निर्वाण वर्षानिमित्त आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम – आळंदी
• आषाढी वारीमधील स्त्री संतांच्या जीवनावर आधारित दोन चित्ररथ
• औरंगाबाद येथील शाहू फुले आंबेडकर जलसा
• मुंबई येथील स्वराज्य महोत्सव अंतर्गत आठ विशेष कार्यक्रम
• मुंबई येथे लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित नाटक
• रत्नागिरी येथे लोकमान्य टिळक जयंती कार्यक्रम
• राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम – औरंगाबाद, पनवेल, अमरावती, नागपूर, जळगाव
• संत चोखामेळा पुण्यतिथीनिमीत्त भव्य वारकरी दिंडी सोहळा – पंढरपूर
• राजर्षी शाहू महाराज स्मृतीशताब्दी कार्यक्रम – जळगाव
• शाहिरी महोत्सव – बीड
भविष्यातील प्रस्तावित कार्यक्रम–
• संपूर्ण मराठवाडा- मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
• मुंबई, ठाणे- दर्या महोत्सव
• नागपूर- आंतरराज्यीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव
• आंतरराज्यीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव
• नाशिक – कृषी संस्कृती महोत्सव
• रायगड – रायगड महोत्सव
• मुंबई – जुन्या नाट्य संहितेचे जतन कार्यक्रम
• संपूर्ण महाराष्ट्र – निवडक नाटकांचे प्रयोग
• माहूर, कोल्हापूर, तुळजापूर, वणी-दुर्गा महोत्सव
• रामटेक -कालिदास महोत्सव
• सोलापूर -महिला संतांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम
• मुंबई, नाशिक, नांदेड -लोक शाहीर अण्णा भाऊ साठे, वामन दादा कर्डक व शाहीर साबळे यांच्याशी निगडीत विशेष कार्यक्रम
• राज्यातील 36 जिल्ह्यातील वृद्धाश्रमात एकाच वेळी सांस्कृतिक समुपदेशन व प्रबोधन कार्यक्रम घेणे प्रस्तावित आहे
• राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यात आयोजन – शंभर दिवस, संपूर्ण राज्यात चित्ररथाचे संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, माहितीपट तयार करणे अशा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
• 36 जिल्ह्यात ‘सूर महाराष्ट्राचा’ भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत स्पर्धा आयोजन
• आंतरराज्यीय सांस्कृतिक सेतू उपक्रमांतर्गत नोव्हेंबरमध्ये 22 राज्यांचे लोककलाकार महाराष्ट्रात सादरीकरण करतील.