
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यातील पाथ्री येथे असलेले श्री साईबाबा मंदिर व परिसर विकसित करण्यासाठीचा सुधारित आराखडा लवकरच मंजूर केला जाईल, असे आश्वासन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराजे देसाई यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने काल विधानपरिषदेत दिले.
पाथ्री येथील राष्ट्रवादीचे आमदार तथा विधानपरिषद तालिका सभापती मा. बाबाजानी दुर्रानी यांनी हा प्रश्न उपस्थित करुन उपसभापती महोदया निलमताई गो-हे यांच्या माध्यमातून मंदिर विकासासंबंधीचा सुधारित आराखडा कधी मंजूर करणार असे शासनाला विचारले. त्यावेळी ना. देसाई यांनी वरील प्रमाणे उत्तर दिले.
आ. दुर्रानी यांनी सभागृहात पुढे असेही सांगितले की, परभणी जिल्ह्यातील पाथ्री तालुका येथेच श्री साईबाबांच्या जन्म झाला आहे. बाबांच्या या जन्म स्थानाची नोंद जिल्हा स्तर गॅझेट, महाराष्ट्र राज्यासनाचे गॅझेट व साईबाबा चरित्रामध्ये सुध्दा आहे. तत्कालीन बिहारचे राज्यपाल तथा पाथ्रीच्या साईबाबा श्रध्दास्थानाचे विश्वस्त मा. रामनाथ कोविंद हे पाथ्रीच्या पवित्र भूमीवर आले त्यावेळी संपूर्ण दक्षिण भारतातून आलेल्या हजारो भक्तांची येथे सुविधा अभावी मोठी गैरसोय झाल्याचे स्पष्टपणे मा.रानाथ कोविंद यांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी मा. कोविंद यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंदिर विकासाच्या दृष्टीने जे जे करणे आवश्यक आहे, त्या सर्व सूचना देतो असे सांगितले होते. एवढेच नाही तर मा. रामनाथ कोविंद हे देशाचे राष्ट्रपती होऊन मुंबईतील गव्हर्नर भवन आले त्यावेळीही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना तेथे बोलवून घेतले तेव्हा पण त्यांनी विकासासंबंधीच्या सूचना दिल्या होत्या. प्रारंभी पहिल्या बैठकीत बनविण्यात आलेला १ लाख २०१ कोटींचा आराखडा बदलून नंतर तो दस-या बैठकीत १९५ कोटींचा सुधारित आराखडा तयार करण्यात आल्याचेही आ. दुर्रानी यांनी सांगितले.
मा. रामनाथ कोविंद हे राज्यपालांचे राष्ट्रपती झाले शिवाय आराखड्या मागून आराखडे बनविले गेले, तरीही हा सुधारित आराखडा कधी मंजूर केला जाईल, हा प्रश्न अद्याप प्रलंबितच राहिला असल्याचे सांगत त्यावेळी नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे हे आता मुख्यमंत्री झाल्यामुळे साईबाबा श्रध्दास्थानाचे काम नक्कीच पूर्ण होईल नव्हे तसा त्यांनी विश्वासच दिला होता असेही आ. दुर्रानी यांनी यावेळी सांगितले.
याप्रकरणी राज्य शासनाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शिखर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्या कमिटीच्या माध्यमातूनच सदर मंदीर विकासासाठीचे व आराखड्याचे काम केले जाणार असल्याचे समजते. १८ऑगष्ट २०२२ रोजी या शिखर कमिटीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सदर बैठकीविषयी जी तयारी करणे आवश्यक आहे, ते शक्य झाले नसल्यानेच नियोजित बैठक अचानक रद्द करणे भाग पडल्याची कबूली देत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी आ. दुर्रानी यांनी जी काही माहिती दिली, ती वास्तव असल्याचे सांगत साईबाबा मंदिर विकासाच्या बाबतीत सुधारित आराखड्याला मंजुरी देण्यासाठी लवकरच शिखर बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे यावेळी कबूल केले.
पाथ्रीच्या श्री साईबाबा श्रध्दास्थानाचे असलेले पावित्र्य आणि येथे येणाऱ्या हजारो भाविक भक्तांना होणारा कमालीचा त्रास ध्यानी घेऊन आमदार दुर्रानी यांनी अत्यंत तळमळीने या प्रश्नाचा पाठपुरावा मागील अनेक वर्षे लावून धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दिलेला विश्वास आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने सभागृहात दिलेल्या सकारात्मक उत्तर यामुळे भाविक भक्तांचा आनंद द्विगुणित होणे स्वाभाविक आहे. शिवाय ते दिवस आता फार काही दूर नसून लवकरच या पवित्र कामाला चालना मिळेल अशी खात्री पटली जात आहे. त्यामुळे संबंध परभणी जिल्ह्यातील नागरिक व भक्तांमध्ये कमालीचा आनंद व्यक्त होत आहे.