
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर
पुणे : पुण्यातील पाषण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना फिरण्यासाठी आणि बसण्यासाठी घातलेला बंदीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. त्या गेटबाहेर लावलेली पाटी पुणे महापालिकेनेच काढून टाकली. चौफेर टीकेनंतर पुणे महापालिकेने आज सकाळी हा निर्णय घेतला. त्यामुळे अविवाहित जोडप्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
पाषाण तलाव परिसरात फिरणाऱ्या अविवाहित जोडप्यांमुळे पक्षी निरीक्षकांना त्यांच्या कामात अडथळा होत असल्याची तक्रार त्यांनी महापालिका अभियंत्यांकडे केली होती. याबाबत पुणे महापालिकेने तात्काळ दखल घेऊन अविवाहित जोडप्यांना परिसरात फिरण्यास मज्जाव करणात आला होता. मात्र या निर्णयाची चर्चा पुण्यासह महाराष्ट्रात व्हायला लागली.
पुण्यामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये एमपीएससी आणि यूपीएससी करणारे मुलं मुली ही महाराष्ट्रातून शिक्षणासाठी येत असतात. तरुण तरुणींच्या वाढत्या आकड्याने पुण्यात अविवाहित जोडप्यांचीही वाढ होताना दिसत आहे. म्हणून आता जोडप्यांना फिरण्यासाठी जागा कमी पडू लागल्या आहेत. अशातत पाषाण तलाव परिसरात बंदी आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
या विरोधात अनेक संघटना महापालिकेवर टीका करू लागल्या होत्या. म्हणून आज सकाळी महापालिकेने गेट बाहेर लावलेली बंदीची पाटी काढून टाकली. त्यामुळे तेथे फिरायला येणा-या अविवाहीत जोडप्यांना दिलासा मिळाला.