
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : बच्चन कुटुंबाकडे बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून पाहिलं जातं. कलाजगतात मोलाचं योगदान देणाऱ्या या कुटुंबानं कायमच सर्वच बाबतीत समाजापुढं आणि चाहत्यांपुढं काही आदर्श प्रस्थापित केले आहेत.
नातेसंबंधांमध्ये असणारे बंध कसे दृढ करावे याची शिकवणही याच कुटुंबानं दिली.
बिग बीच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीविषयी चाहत्यांना सतत हेवा वाटतो. पण, त्यातही अमिताभ बच्चन आणि त्यांच्या लेकीचं नातं विशेष लक्ष वेधणारं ठरतं. सेलिब्रिटीची लेक असली तरीही श्वेता बच्चन नंदा हिनं स्वत:चीही ओळख प्रस्थापित केली आहे.
बऱ्याच कार्यक्रमांना श्वेता तिच्या वडिलांसोबत म्हणजेच बिग बींसोबत हजेरी लावताना दिसते. पण, तिचं प्रत्येकवेळी माहेरच्यांसोबत दिसणं काही प्रश्नांनाही वाव देतं. काहींना तर, भलत्याच चिंता सतावतात. लेक माहेरी असल्यावर होणाऱ्या चर्चा आणि चिंता कोणत्या हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
श्वेताविषयी चाहत्यांना वाटणारी चिंता आपलेपणाच्या भावनेतून निर्माण झाली असली तरीही हे प्रकरण इतकं गंभीर नाही. श्वेता तिच्या सासरच्या, पतीच्या घरापासून दूर राहते म्हणजे तिच्या नात्यात काही अडचणी आहेत असं नाही.
श्वेता आणि तिचा पती, निखील नंदा हे दोघंही वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यामुळं त्यांना फार क्वचितच कोणत्या कार्यक्रमात एकत्र पाहिलं जातं. निखील एस्कॉर्ट्स ग्रुप मध्ये MD पदावर कार्यरत आहे. तर मॉडेल, फॅशन डिझायनर अशी ओळख तयार करत श्वेता एक स्वावलंबी महिला म्हणून समाजात अभिमानानं जगतेय, मुलांना उच्चशिक्षण देत त्यांच्या सर्व इच्छा पूर्णही करतेय. पत्नीच्या या कामगिरीचा निखील नंदालाही प्रचंड अभिमान आहे.
एकमेकांच्या कार्यक्षेत्रांच्या आणि करिअरच्या गरजा पाहतचा ते वेगवेगळ्या शहरांमध्ये असतात. पण, अर्थात ही जोडी कार्यक्रम किंवा बऱ्याच प्रसंगी एकत्रही असते.
थोडक्यात काय, वडिलांकडे राहत असली तरीही श्वेताच्या आयुष्यात कोणतंही वादळ वगैरे आलेलं नाही. उलटपक्षी काही समजुती मोडित काढणाऱ्या श्वेताला पतीसह संपूर्ण कुटुंबाची साथ पावलोपावली मिळत आहे.