
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
कंधार तालुक्यात जेष्ठागौरी आगमन,पुजन, विसर्जन सोहळा अतिशय उत्साहपुर्ण व प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.गणेशचतुर्थीच्या नंतर चार दिवसांनी महालक्ष्मी अर्थातच गौरीच्या सणाचा महिमा भारतीय संस्कृतीत अतिशय महत्वपूर्ण मानला जातो.भाद्रपद महिन्यातील या महालक्ष्मीच्या सणामुळे कंधार येथील बाजारपेठेत गर्दी ने उच्चांक गाठला असल्यामुळे खरेदी दारांसह विविध फळ-फुल, भाज्या, दागदागिने, सजावटीच्या आधुनिक पद्धतीने बनविलेल्या नाजूक साजुक वस्तूंसह लक्ष्म्यांचे विविध मुखवटे खेळणी विक्रेते यांनी यावेळी लक्षणीय विक्री केल्याचे अनेक विक्रेत्यांनी बोलून दाखवले.परंतू मागील दोन वर्षांतील कोरोनानंतर फुललेली बाजार पेठ पाहून सर्वांच्या डोळ्यांचे जणू पारणेच फिटले. कोरोना काळात हा उत्सव-सण अतिशय साधे पणाने साजरा केला गेला.
प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी लोहा तालुक्यात घरोघरी भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर दि.३ सप्टेंबर रोजी अतिशय उत्साहपुर्ण व प्रसन्न वातावरणात गौरीचे आगमन झाले.दुसऱ्या दिवशी ४ सप्टेंबर रोजी जेष्ठा नक्षत्रावर गौरीचे पूजन केले गेले.यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या ठराविक रानभाज्या,पालेभाज्या, विविध प्रकारची फळे आणि बुंदीचे लाडू,रव्याचे लाडू, करंज्या,विविध लाडू, अनारसे,पुरण पोळी, पिठाची दिवे,फळ,कडी,आमटी,भात,पापड,सह स्वादिष्ट रुचकर अस्सल मराठमोळी पदार्थांचा नैवेद्य करून केळीच्या पानावर गौरीची मनोभावे नैवेद्य ठेवून आरती करून जीवनात सुख समृद्धी मिळण्यासाठी घरोघरी साकडे घातले गेले. महालक्ष्मी अर्थातच गौरीच्या सणाचा महिमा म्हणजे तिसऱ्या दिवशी ५ सप्टेंबर रोजी मुळ नक्षत्रावर सोमवारी गौरीचे रात्री विसर्जन केले गेले.तत्पुर्वी पहाटेच्या वेळी सुताच्या गाठी पाडल्या गेल्या.या सुतात हळदी कुंकू रेशमी सुत,बेल, विविध जिन्नसांनी त्यात भर घातल्याची दिसून येत होती.सायंकाळ नंतर रात्रीच्या वेळी नैवेद्य दाखवून विसर्जन केले गेले.त्यावेळी घरात सुख समृद्धी नांदो अशी घरोघरी महालक्ष्मी चरणी प्रार्थना केली गेली.
एका प्राचीन कथेनुसार महालक्ष्मी म्हणजे गौरी ही पार्वतीचा अवतार असून गौरी हि गणपतीची माता आहे.तीन दिवस चालणाऱ्या या सणाला अतिशय महत्त्वाचे स्थान असुन या सणाला महिला मंडळाची अखंड सौभाग्य प्राप्ती साठी महत्वाचे स्थान देतात म्हणून या सणाला भारतीय संस्कृतीत अतिशय महत्वाचे मानले गेले असल्याची प्रचिती येते.एकंदरित कंधार तालुक्यात महालक्ष्मी अर्थातच जेष्ठागौरी सणानिमित्त मागणी करत साकडे घातले कि, भरपूर पिक पाणी होवू दे, घरादारात सुख समृद्धी, आरोग्य धन धान्य संपदा होवू दे.., कोरोना सारख्या महामारीतून कायमस्वरूपी मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना केली.अशा प्रकारे कंधार तालुक्यात जेष्ठागौरी तथा महालक्ष्मी सण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.