
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय कराळे
**************************
कोणत्याही खासगी वाहनांवर पोलीस, प्रेस, वकील, आर्मी, अथवा शासन लोगो आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा परभणी पोलिसांनी दिला आहे.
कोणत्याही वाहन चालकाने आपल्या खासगी वाहनांवर वरील प्रमाणे नमूद कोणत्याही सेंबॉलचे स्टीकर्स लावू नये. लावली गेल्यास किंवा तसे आढळून आल्यास ती प्रथमतः काढून टाकली जातील. काढण्यास कोणीही मज्जाव केला किंवा अडथळा निर्माण केला तर मात्र त्या संबंधित वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पठाण यांनी काल परभणीत विसावा कॉर्नर येथे दिला आहे.
पोलीस, प्रेस, वकील, आर्मी, किंवा शासनाचे नाव, लोगो एवढेच नाही तर एखाद्या समितीचे किंवा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचे झाल्यास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, खासगी संस्थांचे पदाधिकारी, शासकीय निवड मंडळं, किंवा न्यायालयीन कक्षेत येणारी वाहनांवरील नावे किंवा लोगो यावर सुध्दा अशी कारवाई केली जाणार आहे का ? असाही सवाल विचारला जाऊ शकतो. त्यापेक्षा या नियमांच्या कक्षेत येणारी व न येणारी नावे नि लोगो कोणती, या विषयीचे माहिती पत्रके प्रसिद्ध केले गेल्यास कोणतीच अडचण निर्माण होणार नाही.
ते पुढे असेही म्हणाले की, वरिष्ठांकडून आलेल्या लेखी आदेशानुसार ही कारवाई परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांसह संपूर्ण झोनमध्ये केली जाणार आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पठाण यांनी सांगितलेली ही माहिती जर खरी असेल तर ती चांगलीच ठरु शकेल. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही स्टीकर्स लावून त्याचा गैरकृत्यासाठीही वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गैर कृत्यांवर मोठ्या प्रमाणात आळाही बसू शकेल यात वादच नाही, तथापि हा नियम केवळ मराठवाडा झोनमध्येच अंमलात आणला जाणार आहे का ? किंवा तसा आदेश संपूर्ण राज्यभरासाठी सुध्दा लागू केला गेला आहे किंवा जाणार नाही, याविषयी मात्र खात्रीपूर्वक असे ठोस कांहीच सांगितले नसल्याने नेमकं त्या मागचं इंगित ते काय असू शकतं, याविषयी मात्र उलट सुलट चर्चा सुरु असल्याचं बोलले जात आहे. कोणताही नियम लागू करायचा झाल्यास त्याची अंमलबजावणी केवळ मराठवाड्यातच न होता ती संपूर्ण राज्यभरात लागू होणं क्रमप्राप्त आहे.