
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पिंपरी चिंचवड : दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या मुलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. आदित्य ओगले असं हत्या करण्यात आलेल्या सात वर्षांच्या मुलाचं नाव आहे. गुरुवारी आदित्यचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरु होता. गुरुवारी इमारतीच्या खाली खेळत असताना आदित्य बेपत्ता झाला होता.
‘मी खेळायला जातो’, असं सांगून आदित्य गुरुवारी घराबाहेर पडला होता. संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास आदित्य बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं. तसा मेसेज दोन दिवस समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला होता. अखेर आदित्यच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानक गाठलं. आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
त्यानंतर शुक्रवारी भोसरीतील एका इमारतीच्या टेरेसवर रात्री आदित्यचा मृतदेह आढळून आला आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आता आदित्यच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे.आदित्यचं अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याची दाट शंका घेतली जातेय. सध्या पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना ताब्यातही घेतलंय. त्यांची कसून चौकशी केली जाते आहे.