
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : परभणी येथे कार्यरत कामगार न्यायालय जालना येथे स्थलांतरित करुन परभणी जिल्ह्यातील समस्त कामगार वर्गांवर अन्याय केला गेला आहे. सदरचे कामगार न्यायालय जालना येथून तात्काळ परभणीत हलविले जावे, अशी मागणी दैनिक चालू वार्ता चे परभणी उपसंपादक दत्तात्रय वामनराव कराळे यांनी केली आहे.
परभणी येथे कार्यरत असलेले आयकर कार्यालय हिंगोली येथे तर कामगार न्यायालय जालना येथे स्थलांतरित करुन परभणी शहर व जिल्ह्याला पूरते पोरके करुन ठेवण्याचा कुटील डाव ज्या कोणी केला होता, त्यांचे परभणीच्या विकासाशी एकप्रकारे हाडवैरच असले पाहिजे. निजामकालीन व सर्वात जुना जिल्हा असूनही येथील कार्यरत दोन्ही कार्यालये एक हिंगोली येथे तर दुसरे जालना येथे हलवून परभणीला पोरके करुन टाकले होते.
याप्रकरणी दैनिक चालू वार्ता ने जुलै महिन्यात वृत्तांकन प्रसिद्ध करुन या माध्यमातून परभणी जिल्ह्यावर झालेला अन्याय दूर केला जावा, अशी मागणी केली होती. दरम्यान हिंगोली येथे स्थलांतरित आयकर कार्यालय परभणी येथे पुन्हा स्थलांतरित करावे यासाठी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. क-हाड यांनी वरिष्ठांशी प्रदीर्घ चर्चा करुन ते हलवण्याचे निर्देश दिले. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करणे क्रमप्राप्तच आहे. तथापि जालना येथे स्थलांतरित कामगार न्यायालय सुध्दा लवकरात लवकर पुन्हा परभणीला आणून ते कार्यान्वित करावे अशी मागणी पुन्हा दै. चालू वार्ता ने केली आहे.
परभणी जिल्ह्यात कार्यरत असलेली व ती राजकीय स्वार्थापोटी जाणीवपूर्वक अन्यत्र स्थलांतरित केली गेली आहेत, ती सर्वच्या सर्व कार्यालये असो वा प्रकल्प, ती पुन्हा परभणी जिल्ह्यात परत आणून परभणी जिल्ह्याचे गत वैभव स्थापित करावे अशी विनम्र प्रार्थना आहे.
निजामकालीन जिल्हा असूनही विकासापासून कोसो दूर ठेवला गेला आहे. सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्याऐवजी येथे कार्यरत असलेले प्रकल्प व कार्यालयेच हटवण्याचा घाट घातला गेला. विकास करण्याचे पूण्य घेण्याऐवजी परभणीला भकास करण्याचे महापाप ज्यांनी ज्यांनी केले, त्यांना परमेश्वर सद्गती देवो नि पुन्हा विकासाला चालना मिळू शकेल यासाठीचे प्रयत्न त्यांनी पुन्हा करावेत अशी त्यांनाही विनंती आहे.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वय साधून एकोपा निर्माण करावा आणि परभणी शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्याच्या उत्थानासाठी राज्य व केंद्र शासनाकडे वारंवार शिषटमंडळे नेवून भरपूर निधी प्राप्त करुन घ्यावा. प्रसंगी परभणीच्या उत्नाथासाठी तीव्र आंदोलने छेडली जावून शासनास नमते घेणे भाग पाडावे, अशी माझी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनाही विनम्र प्रार्थना आहे. पूर्णा व परभणी या दोन्ही ठिकाणी रेल्वे जंक्शनची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवली जाऊन देशपातळीवरील सर्वच रेल्वे स्थानके पूर्णा व परभणी जंक्शनशी जोडली जावीत ज्यामुळे संबंध देशभर परभणी जिल्ह्याची नाळ जोडली जाऊ शकेल. परिणामी कमालीचे दळणवळण वाढीस लागून परभणीच्या औद्योगिक क्षेत्रातही मोठी भर पडू शकेल.
परभणी ते मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाला अधिक प्रमाणात गती देऊन सदरची रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु होणे अत्यंत आवश्यक आहे. परभणीच्या औद्योगिक वसाहतीमधील बंद गाळे कार्यान्वित केली जावीत शिवाय रिक्त प्लॉटिंगचे अलॉटमेंट जाहिर करुन इच्छूक उद्योजकांना विशेषता तरुणाईला वाव दिला जावा जेणेकरुन बेकारी नाहिशी तर नाही परंतु काही अंशी का होईना, ती कमी होऊ शकेल. ज्यांना कामाची गरज आहे, त्यांच्या हाताला काम मिळले जाऊन उपासमारीची पाळी दूर होऊ शकेल. कालांतराने इच्छूक उद्योजकांच्या संख्येत वाढ झाली तर नव्यानेच मंजूर झालेल्या औद्योगिक वसाहती संबंधीच्या जमिनी बाबत सुध्दा अधिक शिघ्र गतीने चालना देणे शक्य होऊ शकेल. येथे कार्यरत असलेली सूत गिरणी स्थानिक उद्योजकाला चालवण्यास घेण्यासाठी प्रोत्साहित केल्यास स्थानिक मजूरांना हक्काचा रोजगार मिळू शकेल. येथला औद्योगिक व्यवसाय अधिक प्रगतीशील राहिला जावा यासाठी टाटा सारख्या प्रकल्पाची नितांत आवश्यकता आहे परंतु त्यासाठी कायमचा वीजपुरवठा कार्यरत राहिला जाईल यासाठीची स्वतंत्र वीज निर्मिती केंद्र किंवा पुरवठा करणारी यंत्रणा येथे उभी केली जाणे आवश्यक आहे. जेणेकरून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची वा प्रोडक्शन निर्मितीवर अघटीत परिणामाची भीती राहाणार नाही. नियमित व कधीही खंडित न होणारा मुबलक असा वीजपुरवठा आणि दळणवळणाची मुबलक साधने मोठ्या प्रमाणात कायम स्वरुपी येथे उपलब्ध झाली तर औद्योगिकीकरणाला मोठा वाव मिळू शकेल. सुशिक्षित व कुशल, अकुशल कामगारांना हक्काचा व कायम रोजगार मिळू शकेल. बेकारी कमी होईल. बंद हातांना काम मिळेल. अनेकांचे उघड्यावर पडलेले संसार सावरले जाऊ शकतील यात तिळमात्र शंका नसावी.