
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक सरतासरता पोलिसही काही ठिकाणी बेधुंद नाचले. काही ठिकाणी त्यांनी यथेच्छ ठेका धरला. या ठेक्याची किंवा पोलिसी नृत्याची व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. वर्दीतील पोलिसांना हे शोभतं का? असा प्रश्न काहींनी विचारला. तर काहींनी पोलिसांचे समर्थन व कौतुकही केले. पोलिसांनी मिरवणुकीत कर्तव्य पालन केले नसल्याची टीका करत थेट पोलीस आयुक्तालयात जात गुलाबाचे फुल देत गांधीगिरी आंदोलन देखील करण्यात आले
विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना नाचणं शोभतं का? पुण्यात रंगला वाद; कुठे निषेध, तर कुठे सत्कार झाला. दोन दिवसात सोशल मीडियावर ‘पोलीस नृत्याबद्दल’ प्रतिक्रियांचा अक्षरशः धो धो पाऊस पडला. याबाबतीत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या आदेशाचं पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पोलीसांची आहे. नेत्यांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी मुक्त परवानगी देणं योग्य नाही, असं सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी म्हटलंय. तर पोलिसांनी कर्तव्यपालन न केल्याचा निषेध त्यांनी फुलं देऊन केला.
दुसरीकडे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे यांनी याच्या अगदी उलट पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक करत त्यांचा थेट वाहतूक आयुक्तालयात जात फेटा बांधूनच सत्कार केला.
वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली. आपल्या सहकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अतिशय चांगलं काम केल्यानेच गणेशोत्सव अतिशय जल्लोषात कुठेही गालबोट न लागत पार पडला आहे
पोलीस कायम दबावात असतातच. पगार नाही, सुट्टी नाही, सणासुदीला नेमकी ड्युटी, कुटुंबासमवेत वेळ घालवता येत नाही, रहायला घर नाही, पॅरेंट्स मिटिंगला जाता येत नाही, हज्जार रिसिविंग, शिवाय बॉसची, समाजाची बोलणी वेगळीच… याशिवाय रेग्युलर ड्युटी….अशा स्थितीत ३२-३३ तासांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त आटोपुन रिलॅक्स व्हायला पोलिसांनी ठेका धकला तर चुकलं कुठं? जो समाज ज्यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे सुरक्षित आहे अशा वेळी या लोकांनी त्यांच्यावर टीका न करता त्यांचे कौतुकच केले पाहिजे, असेही आता बोललं जात आहे