
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकातील प्रलंबित विविध विकास कामे व समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, नंदीग्राम व देवगिरी या दोन्ही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना फलाट क्रमांक एकवरच थांबा दिला यासाठी लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा देत त्या आंदोलनाचीच झलक म्हणून दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर सचखंड एक्स्प्रेसला रोखत तिचा चक्का जाम करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, वयोवृध्दांसह समस्त प्रवासी वर्गाची होणारी कमालीची गैरसोय दूर करण्यासाठी नंदीग्राम व देवगिरी या दोन्ही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना परभणी स्थानकातील फलाट क्रमांक एकवरच थांबा देणे आवश्यक आहे. प्रवाशांसाठी वातानुकूलित हॉलची सोय करणे, रेल्वे स्थानक परिसर व रेल्वेमधील प्रवासा दरम्यानची सुरक्षा यंत्रणेवरील मनुष्य बळ अधिक प्रमाणात वाढवून ती सुरक्षा अधिकच कडक केली जावी, रेल्वे परिसरात होणारी अवैध ॲटो रिक्षांची जबरी घुसखोरी तात्काळ सोपविली जाणे, एमआयडीसी अंतर्गत पूर्णा व परभणी स्थानकातील ब्रीज त्वरेने कार्यान्वित करणे, पूर्णा रेल्वे स्थानकातील ओव्हर फूट ब्रीज त्वरीत सुरु करणे, ही व अशी अनेक प्रलंबित विकास कामे व समस्या ताबडतोबीने मार्गी लावाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनाची झलक म्हणून दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर सचखंड एक्स्प्रेसचा चक्का जाम केला जाणार आहे. रेल रोको आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडले जाणार आहे.
याप्रकरणी खा. जाधव यांनी दक्षिण मध्ये रेल्वेचे नांदेड विभागीय व्यवस्थापक यांना दिलेल्या लेखी निवेदनात वरील प्रमाणे इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय परभणी रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या गैरसोयीचे ठरले जाणाऱ्या अगदी एका बाजूला असलेल्या एक्सलेटर व लिफ्ट सतत कार्यरत ठेवण्याऐवजी त्या नेहमी बंदच असतात त्यामुळे त्यांचा असूनही प्रवाशांना काहीच उपयोग होत नाही. रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात (कुंज बिहारी हॉटेल समोर) असलेल्या मोठ्या लोखंडी गेटवर “परभणी रेल्वे स्थानक” हे नाव देवनागरी, मोठ्या व सुवाच्य अक्षरात लिहिले गेल्यास ते सहजपणे कोणालाही व कितीही लांबून दिसू शकेल. शोभून दिसेल व सांस्कृतिक शोभाही वाढीस लागेल. मागील कित्येक वर्षांपासून उजव्या बाजूला वाहनतळावर पडलेला मोठा खड्डा न बंद करता अद्याप तसाच ठेवला आहे. त्यामुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो. परिणामी जीवीत हानी सुध्दा टाळता येणार नाही. मध्ये मध्ये शेड नसल्यामुळे प्रवाशांना आपले सामान व परिवार सोबत घेऊन तसेच भिजत फलाटावर भिजत फिरावे लागते. सर्वच पाणपोईंची साफसफाई केली जात नाही, असेल तेव्हा परंतु इच्छा असूनही पाणी पिण्यासाठी कोणीच प्रवाशी धजावत नसतात. विकासाची कामे जी जी प्रलंबित आहेत, ती सर्व तातडीने पूर्णत्वास न्यावीत, ज्या समस्या मार्गी लावणे आवश्यक आहेत, त्या तात्काळ सोडविल्या जाव्यात, जेणे करुन नागरिकांना यातना सहन कराव्या लागणार नाहीत. या मागण्या मान्य करणे व त्या समस्या निवारणाचा प्रश्नही खासदार साहेबांनी निकाली निघावा यासाठी विशेष लक्ष घालावे अशी विनंती दै. चालू वार्ता चे उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय कराळे यांनी केली आहे.