
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
• विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांप्रश्नी चर्चा
• नागपूर अधिवेशनात विशेष सत्र घेणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
अमरावती–दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी आज(१४ सप्टेंबर) मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.प्रामुख्याने विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्त्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
नापिकी,दुष्काळ,अतिवृष्टी अशा संकटाच्या मालिकेत विदर्भातील शेतकरी सापडले आहेत.वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी हताश झाले असून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे.त्यावर उपाय म्हणून सरकारकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे पॅकेज जाहीर होत आहेत.मात्र शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे.अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ,खते व कीटकनाशकांसाठी येणारा अतिरिक्त खर्च,शेतमालाला योग्य भाव न मिळणे,मुलांचे शिक्षण इत्यादी कारणांमुळे या शेतकरी आत्महत्या होत असल्याचे समजून येते.अशा विविध प्रश्नांवर आज दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात पोहरेंची भूमिका मान्य केली.त्याचप्रमाणे यापुढील नागपूर अधिवेशनामध्ये विदर्भातील शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विशेष सत्र घेऊन आपण स्वतः त्याबद्दल तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पोहरेंना दिले.यावेळी पोहरे यांच्या समवेत दिल्ली येथील पत्रकार आशुतोष पाठक,साप्ताहिक कृषकोन्नतीचे सूर्यकांत भारतीय,महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी ॲड.अनंत खेळकर आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी पातरुडकर हे सुद्धा उपस्थित होते.